खूनप्रकरणी सात आरोपींना जन्मठेपFile Photo
Published on
:
18 Nov 2024, 9:33 am
Updated on
:
18 Nov 2024, 9:33 am
कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण खून प्रकरणातील सात आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी 10 डिसेंबर 2014 रोजी प्रकाश चव्हाण याचा पूर्णानगर, चिंचवड येथे गोळ्या झाडून निर्घृण खून केला होता. तब्बल दहा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे.
प्रकाशसिंग बायस, दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमोल नारायण शिंदे, अमर दिनकर शेवाळे, शाम चंद्रकांत जगताप, संजय नारायण शिंदे, अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश चव्हाण याची स्वतःची एक गुन्हेगारी टोळी होती. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याची परिसरात दहशत होती. याटोळीची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून चव्हाण यांचा गेम करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार, त्यांच्या हालचालीवर ते पाळत ठेऊन होते. दरम्यान, 10 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश चव्हाण पूर्णानगर येथील एका सलूनमध्ये गेला. त्यावेळी हल्लेखोर सलून बाहेर दबा धरून बसले होते.
प्रकाश चव्हाण सलूनच्या बाहेर येताच आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. तसेच, धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रकाश चव्हाणला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या हल्ल्यात प्रकाश चव्हाण याचे अंगरक्षक देखील जखमी झाले. तसेच, एका आरोपीचा घटनेदरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे.
याप्रकरणी निगडी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हयाचा तपास करत असताना आरोपी तत्काळ निष्पन्न केले. तसेच, आरोपींना बेड्या ठोकून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल, वाहने आणि इतर साहित्य देखील जप्त केले. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.बी. नाईकपाटील, पोलिस निरीक्षक आर.बी. उंडे यांनी मोठ्या कौशल्याने तपास करुन वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. पोलिस उपनिरीक्षक गोविंद मरभळ, हवालदार अनिल जगताप, यांनी सबळ पुरावे सादर केले. अंतिम सुनावणी नंतर न्यायालयाने सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.