श्रीगोंदा : घरफोडीच्या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या संशयित आरोपीस ताब्यात घेण्यासाठी कर्जत पोलिसांनी न्यायालयाबाहेर सापळा लावला; मात्र, पोलिसांना चकवा देत त्या आरोपीने धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले. वडाळी रस्ता परिसरात हा सिनेस्टाईल पाठलागाचा थरार अनेकांनी अनुभवला.
मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेलगाव येथील एका संशयित आरोपीस घरफोडीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. पोलिस तपासात त्याने श्रीगोंदा, कर्जत येथे घरफोडी केल्याचे उघड झाले होते. त्यास तपासकामी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. नंतर त्या आरोपीचा जामीन झाला. त्या संशियतास ताब्यात घेण्यासाठी कर्जत पोलिस न्यायालयाच्या आवारात सापळा लावून बसले होते. याची कुणकुण त्या आरोपीस लागली. जामीन झाल्यानंतर तो काही काळ न्यायालय परिसरात थांबून राहिला. पोलिसांना चकवा देत तो बाजूच्या भिंतीवरून उडी टाकून पळाला. त्याची ही हालचाल पोलिसांच्या लक्षात आली. काही अंतर पुढे जाऊन त्याने अंगातील शर्ट काढून टाकत झाडात लपून राहिला. पोलिस नसल्याची त्याची खात्री होताच तेथून त्याने पळ काढला. पण पोलिस आपल्या पाठीमागून येत असल्याचे त्याने पाहताच तो पळू लागला. पोलिसांनी जवळपास एक किलोमीटर अंतर त्या संशयित आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही तो काही काळ गोंधळ घालत तो मी नव्हेच असे ओरडून सांगत होता.