स्वच्छ , स्वस्त आणि ताजी मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणून बुरोंडी बंदराची ख्याती आहे. मात्र ही ख्याती असलेले बुरोंडी बंदर राजकीय ईच्छाशक्तीच्या अनास्थेमुळे एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत अडकून पडले आहे.
दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदर हे स्वच्छ, स्वस्त आणि ताजी मासळी मिळण्याचे बंदर म्हणून या बुरोंडी बंदराची दापोलीत सर्वदूर ख्याती आहे. या बंदरात मासेमारी करणाऱ्या साधारणपणे 135 च्या आसपास लहान मोठ्या होड्या आहेत. या होड्यांचे मालक आपल्या खलाशी नाखवांसह दररोज मध्यरात्री 2 ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात आणि साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पागलेली मासळी किनाऱ्यावर घेऊन येतात. त्यामुळे बुरोंडीत दररोज खवय्यांना ताजी मासळी विकत घेता येते. बुरोंडीत ताजी मासळी विकत मिळत असल्याने तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांसह घरी खाण्यासाठी मत्स्यहारी खवय्ये हे मासळी विकत घेण्यासाठी येथे येत असतात. अशा या बंदरात स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून गेली तरी बंदरात अजूनही मासेमारीसाठी महत्वाची समस्या असलेल्या साध्या जेटीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे समुद्रातून पागून आणलेल्या मासळीच्या होड्या या किनाऱ्याला लावताना कमरेभर पाण्यातून मासळीच्या टोपल्या आणताना मासेमारांची चांगलीच दमछाक होत असते. बंदरात जेटीची जशी महत्वाची समस्या निकाली काढण्यात राजकीय अनास्था आहे तसे बुरोंडीत मासळी विक्री करिता येथे मच्छि मार्केटची समस्या कित्येक वर्षे आ वासून उभी आहे.
मासळी विक्रि करिता इमारत नसल्याने मासळी खरेदीसाठी बुरोंडीत दुर दुरहून आलेल्यांना एकतर सकाळीच बंदरावर येवून मासळी विकत घ्यावी लागते ही जशी समस्या तीव्र आहे तसे मासळी विक्रेत्या महिलांना भर उन्हात बसूनच उघडयावर बसून मासळीची विक्रि करावी लागते . या मध्ये उन्हाच्या कडाक्याने मासळी खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच मासळी मार्केटची ईमारत नसल्याने मासळी विक्रेत्या महिलांना प्रसाधन गृहाची सोय नाही. त्यामुळे महिला विक्रेत्यांना लघु शंका करावयाची झाल्यास त्यांची मोठीच गैरसोय होत आहे शिवाय पिण्याच्या पाण्याची सोय सुध्दा नाही. अशा प्रकारे एक ना अनेक समस्या या राजकीय अनास्थामुळेच मागे पडून बुरोंडी बंदराचा विकास खुंटला आहे. बुरोंडी बंदरातील अत्यावश्यक अशा प्रकारच्या विविध समस्यां अजून किती काळ वाट पाहिल्यावर समस्यांची पुर्तता होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.