Pune News: सिंहगड, पानशेत परिसरात भटक्या व मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यांत ससे, मोर, हरीण आदी वन्यजीवांसह शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी पाळीव प्राण्यांचे बळी जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये दहशत पसरली आहे.
मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे सिंहगड पानशेतच्या जंगलातील दुर्मीळ वन्यजीवांचे बळी जात आहेत. रानात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या, मेंढ्या, वासरे तसेच शेडमधील शेळ्या, पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा रातोरात फडशा पाडून मोकाट कुत्री जंगलात पसार होत आहेत. पुणे-पानशेत रस्त्यासह सिंहगड व धरण खोर्यातील ओढे, नाले, जंगलात येथील हॉटेल, ढाबे, रिसॉट, चिकन-मटण दुकानदार शिळे अन्नपदार्थ, तसेच सडलेले मांस प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून फेकत आहेत. त्यामुळे या भागात मोकाट कुर्त्यांची संख्या वाढली आहे.
खानापूर, थोपटेवाडी, डोणजे, मणेरवाडी, ओसाडे, निगडे मोसे, आंबी, रुळे, कादवे, कुरण खुर्द-बुद्रुक, पानशेत येथील जंगलात दुर्मीळ वन्यजीवांसह रानडुकरे, मोर, लांडोर, ससे, भेकरे, सायाळ, रानकोंबडे आदींचा अधिवास आहे. मात्र, मोकाट कुत्री आता या वन्यजीवांसाठी धोकादायक बनली आहेत.
आंबी (ता. हवेली) येथील शेडमध्ये शिरून मोकाट कुत्र्यांनी 50 हून अधिक शेळ्यांचा फडशा पाडला आहे. शेतकरी शंकरराव निवंगुणे म्हणाले, मोकाट शिकारी कुत्री कळपाने फिरत आहेत. शेळ्या, मेंढ्या, वासरे यांच्यावरही कुत्रे माणसांसमोर हल्ला करत आहेत. प्रतिकार केला असता ते माणसांवरही हल्ला करीत आहेत. शेतकरी दत्ता रामचंद्र निवंगुणे यांच्या 17 शेळ्या, मेंढ्या व एक वासरू अशा 18 जनावरांचा एकाच रात्रीत मोकाट कुत्र्यांनी फडशा पाडला आहे. भटक्या कुर्त्यांची नसबंदी करण्यात यावी. तसेच, ही कुत्री पकडून न्यावीत, अशी मागणी आंबीच्या माजी सरपंच मंगल लहू निवंगुणे यांनी केली आहे.
वन विभाग व ग्रामपंचायतीची टोलवाटोलवी
ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे सिंहगड, पानशेत वन विभागाने स्पष्ट केले आहे. आमच्याकडे कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची यंत्रणा नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. वन विभाग व ग्रामपंचायतीच्या टोलवाटोलवीमुळे गोरगरीब शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. वन्यजीवांचे बळी जाऊनही वन विभाग सुस्तावला असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.