वडाळा गाव येथील मतदारांच्या बोटाला मतदान केंद्रात जाण्याआधीच एका संशयिताने शाई लावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाPudhari News network
Published on
:
21 Nov 2024, 7:46 am
Updated on
:
21 Nov 2024, 7:46 am
नाशिक : मतदान करण्यासाठी जाणाऱ्या वडाळा गाव येथील मतदारांच्या बोटाला मतदान केंद्रात जाण्याआधीच एका संशयिताने शाई लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदानापूर्वीच मतदारांना पैसे देत त्यांच्या बोटाला शाई लावून मत बाद करण्याचा प्रयत्न संशयित करत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितास पकडले असून त्याच्याविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वडाळा गाव येथे बुधवारी (दि. २०) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. पवन बागूल असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गाव येथे संशयित पवन हा मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या बोटाला शाई लावत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. मतदारांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना पैसे देत बोटाला शाई लावण्यात आली. त्यामुळे संबंधित मतदारांचे मतदान बाद ठरवण्याचा प्रयत्न संशयिताने केला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी संशयित पवन यास पकडून इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात सोपवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पवन हा भाजपच्या माजी नगरसेवकाचा वाहन चालक असल्याचे समोर येत आहे.
पोलिस तपासात संशयित पवन बागूल याच्याकडे निव्वळ 200 रुपये आढळून आले. तसेच त्याच्याकडे शाईची बाटली होती. त्याच्या सोबत अन्य कोणी असल्याचेही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोपाची इंदिरानगर पोलिस शहानिशा करत आहेत. तसेच मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई नेमकी कोणती होती, याचीही तपासणी पोलिस करीत आहेत. बुधवारी (दि.20) रात्रीपर्यंत संशयिताविरोधात गुन्हा दाखल नसल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली.