अदानी समूह पु्न्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावेळी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी, सागर अदानी यांच्यासह त्यांच्या इतर अधिकाऱ्यांवर लाच देण्याचा, फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. 21 अब्ज, 10 कोटी, 83 लाख, 25 हजारांची लाच देण्याच्या या प्रकरणात न्यूयॉर्कमधील इस्टर्न डिस्ट्रिक्ट्रने या समूहाला चांगलेच फटकारले आहे. भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अदानी समूह जागतिक आणि अमेरिकन गुंतवणूकदार आणि संस्थांना धोक्यात ठेऊ इच्छित होते. त्यातून मोठा निधी गोळा करण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
अदानी ग्रीन एनर्जी या वादाच्या केंद्रस्थानी आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भारतीय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कॅनडा येथील संस्थागत गुंतवणूकदाराशी भागीदारी केली आणि भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे सरकारी संस्थांसाठी भागीदारीचा करार सुनिश्चित करण्यात आला. या करारा आधारे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा करण्यात आला, असा ठपका या समूहावर ठेवण्यात आला आहे. लाचेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर गुंतवणूक उभारण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
हे सुद्धा वाचा
या सर्व प्रकरणात गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांच्यावर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर इतक्या मोठ्या उद्योग समूहावर फंडिंगसाठी कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
कोण आहे सागर अदानी?
सागर अदानी हे गौतम अदानी यांचे पुतणे आहेत. अदानी ग्रीन एनर्जी स्थापन्यात त्यांचा मोठा हात आहे. सागर अदानी यांनी अक्षय उर्जेवर लक्ष केंद्रीत केले आहे. अदानी समूहाची 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क तयार करण्याची योजना आहे. 2015 मध्ये सागर यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे. अदानी ग्रीन समूहाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
काही मिनिटात 2.24 लाख कोटी स्वाहा
अदानी समूहाच्या शेअरवर या वृत्ताचा मोठा परिणाम दिसून आला. अदानी समूहाचे शेअरमध्ये 10 ते 20 टक्क्यांची घसरण दिसून आली. अदानी समूहाचे शेअर सकाळच्या सत्रात 20 टक्क्यांनी घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर 20 टक्क्यांनी तर या समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेजचा शेअर 10 टक्क्यांनी घसरण दिसली. अदानी पोर्ट्समध्ये 10 टक्के, अंबुजा सिमेंटमध्ये 10 टक्के, अदानी पॉवरमध्ये 16 टक्क्यांची घसरण दिसत आहे. या घडामोडींमुळे काही मिनिटांतच अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 2.24 लाख कोटींची घसरण झाली.