६४ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद
गोंदिया (Gondia Assembly Election 2024) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ६४ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ६७.३ टक्के, आमगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ६७.३१ टक्के तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६५.४५ टक्के व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.३२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ६५.०९ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील आमगाव व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील (Gondia Assembly Election 2024) मतदारांनी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान केले. गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी सकाळी ७ वाजेपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण ११ लाख २५ हजार १०० मतदार आहेत. यामध्ये ५ लाख ५३ हजार ६८५ पुरुष मतदार आणि ५ लाख ७१ हजार ४०५ स्त्री मतदार असून १० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील चारही (Gondia Assembly Election 2024) विधानसभा मतदारसंघात एकूण ५ हजार ७२४ अधिकारी-कर्मचारी मतदान पथकात कार्यरत होते. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. युवा मतदारांनी उत्साहाने मतदान करुन या सेल्फी पॉईंटसमोर आपली छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमावर टाकली. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १० मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होती. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष ते पोलीस कर्मचारी देखील महिलाच होत्या.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५ वर्षावरील वयोवृध्द एकूण ४८१ मतदारांनी गृह मतदान केले, तर मतदान पथकात कार्यरत असलेले ६ हजार ४५० अधिकारी-कर्मचारी यांनी पोस्टल बॅलेटद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सकाळी ८.०० वाजता फुलचूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात जावून आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान करता यावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावेळी दिव्यांग व वयोवृध्द मतदारांनी देखील उत्साहाने मतदान केले. निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
महिला मतदारांमध्ये उत्साह
गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेटवटच्या टोकावर असून नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग आहे. आज २० नोव्हेंबर रोजी (Gondia Assembly Election 2024) गोंदिया जिल्ह्यातील मतदान केंद्रावर महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. जिल्ह्यात एकूण ११ लाख २५ हजार १०० मतदार आहेत. यामध्ये ५ लाख ५३ हजार ६८५ पुरुष मतदार आणि ५ लाख ७१ हजार ४०५ स्त्री मतदार असून १० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. २० नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी सकाळी ७.०० वाजेपासूनच अनेक मतदान केंद्रावर महिलांची गर्दी दिसून आली. महिलांनी या निवडणूकीत मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीत जास्तीत जास्त महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १० मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती देण्यात आले होते. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष ते पोलीस कर्मचारी देखील महिलाच होत्या. यासोबतच सखी मतदान केंद्रावर सुध्दा महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.
तीन पिढ्यांनी केले एकत्र मतदान
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील कमरगाव येथील पारधी कुटूंबाच्या तीन पिढ्यांनी एकत्र मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही मतदान केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मीरा रुदाजी पारधी (वय ९७) यांनी कमरगाव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांचा मुलगा योगराज पारधी (वय ६०) आणि नातू त्रिलोक पारधी (वय ३५) यांनीही त्यांच्यासोबत मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्व मतदारांनी मतदान केले पाहिजे, असे मत पारधी कुटूंबियांनी यावेळी व्यक्त केले.