अर्थमंत्री निर्मला सीतारामन. (file photo)
Published on
:
08 Feb 2025, 10:37 am
Updated on
:
08 Feb 2025, 10:37 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या आठवड्यात लोकसभेत नवे आयकर विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दिले. ''मला आशा आहे की पुढील आठवड्यात आयकर विधेयक लोकसभेत मांडले जाईल आणि नंतर ते संसदीय समितीकडे पाठवले जाईल.'' असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाला संबोधित केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सीतारामन यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि संसदेने ते मंजूर केल्यानंतर नवीन विधेयक कधी लागू करायचे? यावर सरकार निर्णय घेईल.
रुपयाची निच्चांकी घसरण, आरबीआय गर्व्हनर काय म्हणाले?
दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, केंद्र सरकार कर्ज सुविधा सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या निच्चांकी घसरणीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, रुपयाबाबत आरबीआयच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आरबीआयचे याबाबत कोणतेही विशिष्ट असे लक्ष्य नाही.
"आम्ही वित्तीय क्षेत्राला तरलता प्रदान करण्यासाठी तत्पर आणि सक्रिय राहू" असे आरबीआय गर्व्हनर मल्होत्रा यांनी नमूद केले आहे.
नवीन आयकर विधेयकाचा उद्देश काय?
नव्या आयकर विधेयकाला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात नवीन आयकर विधेयकाची घोषणा केली होती. नवीन आयकर विधेयक सहा दशके जुन्या आयकर कायदा १९६१ च्या जागी घेईल. प्रत्यक्ष कर कायद्याची कर व्यवस्था सोपी आणि सुटसुटीत करणे आणि कोणत्याही नवीन कराचा बोजा न लादणे हा या नवीन विधेयकाचा उद्देश आहे.
संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीला संपत आहे. हे सत्र १० मार्च रोजी पुन्हा सुरू होईल आणि ते ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे.