Published on
:
27 Nov 2024, 6:25 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:25 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. आता ६ डिसेंबरपासून ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यास प्रारंभ होणार आहे. मात्र या सामन्यात सलामीवर शुभमन गिल हा खेळणार का याबाबत निश्चित झालेले नाही.
शुभमनला १४ दिवस विश्रांतीचा सल्ला
शुभमन गिल याला सराव सामन्यावेळी अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे पर्थ कसोटीत तो खेळू शकतला नाही. आता डिसेंबरपासून ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यास प्रारंभ होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ शनिवारपासून कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिलला सराव सामन्यात खेळणे अवघड आहे आणि ॲडलेड कसोटीत त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाली आहे. गिलला काही आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून निवड होण्यापूर्वी त्याला काही सामन्यांच्या सरावाची आवश्यकता असेल. या दुखापतीमुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी गिल यांना १० ते १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तो सराव सामनाही खेळणार नाही आणि दुसऱ्या कसोटीतही त्याच्या खेळण्याबाबत साशंकता कायम आहे.
गिलने अद्याप नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केलेला नाही. गिल जोपर्यंत नेट प्रॅक्टिस सुरू करत नाही तोपर्यंत संघ व्यवस्थापन त्याला घेण्याची जोखीम पत्करणार नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी गिल तंदुरुस्त झाल्यास ध्रुव जुरेल बाहेर बसणे निश्चित आहे. गिलची दुखापत कितपत बरी होते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
दुसर्या कसोटीचे नेतृत्त्व करणार रोहित शर्मा
कौटुंबिक कारणास्तव रजेवर असल्याने रोहित शर्मा पर्थ कसोटीत खेळू शकला नव्हता. रोहित आता पुन्हा भारतीय संघात सामील झाला असून ६ डिसेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितच्या गैरहजेरीत केएल राहुलने यशस्वीसह डावाची सुरुवात केली होती, पण आता रोहितच्या पुनरागमनानंतरही राहुल सलामी देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रोहित किंवा राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतात की नाही हे देखील शुभमन गिल फिट आहे की नाही यावर अवलंबून असेल. गिल या सामन्यासाठी तंदुरुस्त नसेल तर या सामन्यात राहुल किंवा रोहितपैकी कोणीही तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, असे मानले जात आहे.
मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. दुखापतीनंतर शमी काही दिवसांपूर्वीच मैदानात परतला होता. रणजी ट्रॉफीतील चांगल्या कामगिरीनंतर शमी ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर जाऊ शकतो, अशी चर्चा होती. सध्या तरी शमीला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.