suryakumar yadav wankhede stadium ind vs eng 5th t20iImage Credit source: Bcci and AP
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20i मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी 20i सामना हा रविवारी 2 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यात कॅप्टन सूर्याच्या होम ग्राउंडमध्ये हा सामना होतोय. त्यामुळे गेल्या अनेक सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या लोकल बॉय सूर्याकडून या सामन्यात दणकेदार बॅटिंगची अपेक्षा असणार आहे.
सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
सूर्यकुमार आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी आहे. मात्र सूर्याला गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सूर्याने 8 महिन्यांआधी बांगलादेशविरुद्ध 75 धावांची खेळी केली होती. मात्र तेव्हापासून सूर्याला मोठी खेळी करता आलेली नाही. इतकंच काय या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील 4 पैकी 2 सामन्यात सूर्या भोपळाही फोडू शकला नाही. तर 2 सामन्यात सूर्याने 12 आणि 14 धावा केल्यात. त्यामुळे सूर्याला घरच्या मैदानात कमबॅक करण्याची चांगली संधी आहे. आता सूर्या यात किती यशस्वी ठरतो? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
इंग्लंड विजयाने शेवट करणार?
दरम्यान इंग्लंडने मालिका गमावली तरीही पाचवा आणि शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाने मालिका जिंकली असल्याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात. त्यामुळे टीम इंडियाची युवा ब्रिगेड कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरते? याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
इंग्लंडविरुद्ध टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.