सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊलFile Photo
Published on
:
02 Feb 2025, 6:52 am
Updated on
:
02 Feb 2025, 6:52 am
भिगवण: सासरच्या त्रासाला कंटाळून पोंधवडी येथील विवाहिता प्रतीक्षा तुषार खारतोडे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 1) घडली. यावरून भिगवण पोलिसांनी पती तुषार खारतोडे, सासू मनीषा खारतोडे, सासरा धनंजय खारतोडे व दीर अवधूत खारतोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद नवनाथ आटोळे यांनी दिली.
दरम्यान, प्रतीक्षा हिच्या आत्महत्येचे वृत्त समजताच नातेवाइकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव जमवला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोंधवडीमधील विवाहित प्रतीक्षा हिला लग्नाच्या अवघ्या वर्षभरापासून लवकर न उठणे, काम करीत नसल्याच्या कारणावरून छळ सुरू होता.
त्यानंतर ती आजारी पडल्यानंतर ’तू घरातून निघून जा, दुसरा विवाह करायचा असल्याने घटस्फोट दे’ यावरून प्रतीक्षा हिला मानसिक व शारीरिक त्रास देत होते, असे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या सगळ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वतःच्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. यावरून भिगवण पोलिसांनी नवरा, सासू, सासरा, दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.