विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्नFile Photo
Published on
:
02 Feb 2025, 9:29 am
Updated on
:
02 Feb 2025, 9:29 am
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज (रविवार) दिनांक २ रोजी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला. सनई, चौघडे सप्तसुरांच्या साथीने दुपारी १२ वाजता अक्षदा पडल्या. दिवसभर वऱ्हाडी मंडळींसाठी जेवणावळी सुरू होत्या. या पंढरपूरात काय वाजत गाजत, सोन्याचं बा लगीन देवाचं लागत चे सुरू कानावर पडत असल्यामुळे भाविक तल्लीन झाले होते.
असा पार पडला विवाह सोहळा…।
सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला भरजरी वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री. विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.
दुपारी 12 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेची पाद्यपुजेसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते पार पडली.
त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीसह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटल्या. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला.
यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर आकर्षक फुलांनी सजवले
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यामध्ये जिप्सी, डिजी, सुर्यफुल, गुलाब, लाल रंगाचा गुलाब, पांढरा गुलाब, गुलाबी गुलाब, पिवळा गुलाब, जरबेरा, ऑर्किङ जिनेयम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंडा (लाल, पिवळा) बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना इत्यादी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि १ टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल - श्री रूक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्या निमित्त उत्तम अशा भोजणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये गुलाब जामून, बालुशाही, गोड बुंदी, शिरा, वांग्याची भाजी, पुलाव, डिस्को वडा, पापड, जिलेबी इत्यादी पदार्थांचा समावेश होता.