Published on
:
02 Feb 2025, 11:55 am
Updated on
:
02 Feb 2025, 11:55 am
ओतूर : पुढारी वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरातील गावांमध्ये बिबट्याचे हल्ले अद्याप सुरूच आहेत. रविवारी (दि. २) पहाटे दोन वेगवेगळ्या घटनात दोघेजण जखमी झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
सुनील बबन निमसे (वय ४२,रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर) हे घराबाहेरील शेडमध्ये झोपले असता पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. दुसऱ्या घटनेत अभय विलास घोलप (रा.रोहोकडी, ता.जुन्नर) हे दुचाकीवरून जात असताना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. त्यात घोलप जखमी झाले. दोन्ही घटना रविवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.
ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल मनीषा काळे, रेखा धूम, वनरक्षक रुपावली जगताप, व्ही.ए,बेले, फुलचंद खंडागळे व रेस्क्यू टीमने घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे सांगितले.
नागरिकांनी पहाटे उघड्यावर शौचालयास जाऊ नये तसेच रात्री उघड्यावर झोपू नये व तसेच बिबटप्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.