पूर्व विदर्भातील मच्छिमारांच्या समस्यांबाबत नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत बोलताना मंत्री नितेश राणे. Pudhari File Photo
Published on
:
02 Feb 2025, 2:15 pm
Updated on
:
02 Feb 2025, 2:15 pm
चंद्रपूर : खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय हा पूर्णत: वेगळा आहे. विदर्भात गोड्या पाण्यावर आधारित मासेमारी व्यवसाय होत असून येथील मच्छिमारांच्या समस्यांची आपण गांभिर्याने दखल घेतली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून येथील मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन आणणे, हेच आपले ध्येय आहे, असे मत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पुढाकारातून पूर्व विदर्भातील मच्छिमारांच्या समस्यांबाबत नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे, सहायक आयुक्त अविनाश नाखवा, शुभम कोमरीवार, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दिनेश धोपे, श्री. केशवे आदी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, मासळी उत्पादनात वाढ करणे आणि त्यातून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणे, ही माझी जबाबदारी आहे. मासेमारी व्यवसाय करणारे समाधानी आणि आर्थिक सक्षम असले पाहिजे, हेच आपल्या विभागाचे ध्येय आहे. सरकार म्हणून आम्ही मच्छिमारांच्या पाठीशी उभे आहोत, हे कृतीतून दाखविण्यासाठी दर 15 दिवसांतून याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल.
तलावातील अतिक्रमणबाबत ते म्हणाले, अतिक्रमण ठेवून मासळी उत्पादन वाढू शकत नाही. तलावात झालेल्या अतिक्रमणमुळे मच्छिमारांचे तसेच सरकारचेसुध्दा नुकसानच आहे. अतिक्रमण हटविणे हे प्राधान्य ठेवून पाटबंधारे तसेच जि.प. लघु पाटबंधारे विभागाने तलावातील अतिक्रमण काढण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावा. यासाठी यंत्रणा कामाला लावा. मंत्रालयीन स्तरावर निधीसह आवश्यक ती मदत देण्यास आपण तयार आहोत. अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यकता असल्यास पोलिस प्रशासनाचीसुध्दा मदत घ्यावी.
मच्छिमारांच्या समस्या मांडतांना माजी मंत्री शोभाताई फडणवीस म्हणाल्या, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात गोड्या पाण्यावर आधारित मासेमारी केली जाते. शेती आणि मालगुजारीकरीता येथे ब्रिटीशकालीन तलाव आहेत. या तलावांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून तलावांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. जंगलव्याप्त क्षेत्रात सुध्दा अनेक तलाव असून तलावांचे खोलीकरण करण्यात आले नाही. कागदावर आणि अस्तित्वात असलेल्या तलावांच्या संख्येत तफावत आहे. मासळी ठेवायला कोल्ड स्टोरेज नाही. शासनाकडून केवळ खा-या पाण्यातील मच्छिमारांचाच विचार केला जातो, गोड्या पाण्यातील मच्छिमारांकडे मात्र दुर्लक्ष होते. मच्छिमार कल्याण महामंडळ बरखास्त करावे किंवा या महामंडळात अधिका-यांपेक्षा मच्छिमार प्रतिनिधींची संख्या जास्त असावी. जि.प.चे तलाव बचत गटांना देऊ नये, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.