एसटी महामंडळात सध्या गाड्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांना सेवा नीट देण्यात अडचण येत आहे. त्यामुळे नादुरुस्त गाड्यांच्या बिघाडाने एसटी प्रवाशांचा नाहक खोळंबा होत आहे. अनेक बसेस रस्त्यांत मध्येच बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दुसरी पर्यायी बस येण्याची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे एसटीत आता नव्या 2640 बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र या बसेस दाखल करताना काही लोकप्रतिनिधींकडून आपल्या जिल्ह्याला नव्या मिळाव्यात असा प्रयत्न केला जात आहे. धाराशिवचे पालक मंत्री असलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या जिल्ह्याला २५ बसेस पुरविण्याचा आदेश वादग्रस्त ठरला आहे. या निर्णयाला एसटी यूनियन नेत्यांनी विरोध केला आहे.
14,400 गाड्या शिल्लक
एसटीत अशोक लेलँण्ड कंपनीच्या 2640 स्वमालकीच्या गाड्या टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत. या बसेस मोठ्या आकाराच्या असून त्यांची रंगसंगती आणि आसन व्यवस्था चांगली आहे. या बसेस प्रत्येक आगारास समान पद्धतीने वाटप झाल्या पाहिजेत अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. जर प्रत्येक मंत्र्याने पालकमंत्री या नात्याने आप- आपल्या जिल्ह्याला सरसकट सर्वाच्या सर्व बसेस देण्याचा आग्रह करू लागला तर तोट्याच्या मार्गाचा तोटा कोण भरुन काढणार असा सवाल बरगे यांनी केला आहे. एसटीत दाखल होत असलेल्या 2640 गाड्यांचे सम-समान वाटप झाले पाहिजे. एसटी प्रवाशांचा ओघ पाहिला तर सध्या महामंडळाला 22 हजार गाड्यांची गरज आहे, परंतू प्रत्यक्षात एसटीकडे 14,400 गाड्या शिल्लक आहेत.
त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी या गाड्यांसाठी एसटी प्रशासनाकडे आपल्या मतदारसंघात त्या मिळाव्यात यासाठी रेटा लावत आहेत. यामुळे लोकप्रतिनिधी आता परिवहन मंत्र्यांकडे एसटी महामंडळाकडे पत्र व्यवहार करून दबाव आणत आहेत की आमच्या मतदार संघात गाड्या द्याव्यात अशी मागणी करीत आहेत असे श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. परिवहन मंत्र्यांना सांगायचे आहे की एसटीचे तुम्ही पालक आहात, आता एसटीचा नफा आणि तोटा सुद्धा त्यांनी बघितला पाहिजे. कुणाच्या दबावाखाली जर गाड्या दिल्या तर त्यात एसटीचे नुकसान आहे. कारण तोट्याच्या मार्गावर या गाड्या चालविल्या तर होणार नुकसान कोण भरुन काढणार असा सवालही बरगे यांनी घेतला आहे. एसटी महामंडळाला एका दिवसाला साधारण दोन ते तीन कोटी रुपये तोटा होत आहे. येणाऱ्या नवीन गाड्यामधून तोटा भरून काढणे गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा
गरज आहे तिथेच एसटी गाड्या दिल्या पाहिजेत
अशावेळी व्यवहारिक वागले नाही तर एसटी महामंडळाचे नुकसान होईल यामध्ये लोकांच्या गरजेचा सुद्धा विचार केला पाहिजे. जिथे गरज आहे तिथेच एसटी गाड्या दिल्या पाहिजे. गाड्या वाटापामध्ये असं दिसून आले आहे की एका जिल्ह्याला 50 गाड्या दिल्या आहेत तर एकाला 25 दिल्या आहेत या जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची ही मागणी योग्य नाही, पुणे हा मोठा जिल्हा आहे मात्र तिथे एकच गाडी दिली आहे. गडचिरोली येथे आदिवासी जिल्हा आहे तिथे गाड्यांची गरज असते मात्र तिथे सुद्धा एकच गाडी दिली आहे. अकोला जिल्हा उत्पन्न वाढवण्यासाठी चांगला आहे, तिथे गाड्या दिल्या पाहिजे त्याचबरोबर अजून काही विदर्भातील जिल्हे आहेत तिथे सुद्धा गाड्यांची गरज आहे असे श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.