Published on
:
02 Feb 2025, 11:44 am
Updated on
:
02 Feb 2025, 11:44 am
पुणे : पुढारी वृत्तसेवा
आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्व आहे, आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा ना ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते, क्रिकेट खेळत असताना घर, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती, अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली.
चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात मुलाखतीदरम्यान सचिन तेंडूलकर बोलत होता. यावेळी माधव चितळे, संजय चितळे, केदार चितळे, श्रीकृष्ण चितळे आणि इंद्रनील चितळे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिनची मुलाखत घेतली.
भारतीय क्रिकेटमध्ये सन 2002 मध्ये सर्वप्रथम लॅपटॉप आणि कॅमेरे ड्रेसिंग रूममध्ये दिसले. हे तंत्रज्ञान आत्मसात केल्याने कामगिरीत सुधारणा झाली. सामनागणिक प्लॅन ए व प्लॅन बी आखण्यासाठी मदत झाली. सामना खेळताना दडपण असायलाच पाहिजे. दडपण येणे ही नैसर्गिक बाब आहे. दडपण आल्यावर सामना खेळताना मला नेहमीच मजा यायची. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे पेलवता यायला हवे, असे ही सचिनने सांगितले.
भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे असायचे त्या तू कसे हाताळले असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला, आपल्यावर दबाव असणे आवश्यक आहे, तसे असेल तर काम चांगले होते. 2011 मध्ये विश्वचषक खेळत असताना संघाच्या बैठका व्हायच्या, त्यामध्ये अपेक्षा व्यक्त व्हायच्या, आपण विश्वचषक जिंकायला हवा, अशी प्रत्येकाची भावना असायची. आपल्याला हा कप जिंकायचा आहे, पण त्याचा दबाव घेऊ नका, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. पण सकारात्मकते बरोबरच प्रत्येकजण दबावात होता, त्यामुळे विश्वचषक जिंकू शकलो, त्यामुळे आयुष्यात दबाव असणे आवश्यक असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
1983 मध्ये भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता, त्यामुळे आपण एकदा तो उचलायला हवा अशी भावना सहा वर्षांचा असतानाच माझ्या मनात आली होती. माझे कोच आचरेकर सर माझ्याकडून कसून सराव करून घ्यायचे आणि सरावानंतर स्टम्पवर एका रुपयांचे नाणे ठेवायचे आणि तू 10 मिनिटे आउट व्हायचे नाही असे सांगायचे. शिवाजी पार्कच्या मैदानात कुणीही तुझा झेल घेतला की तू आउट असा नियम आचरेकर सरांनी मला घालून दिला असल्याने मला 10 मिनिटे आऊट न होता खेळावेच लागायचे व चेंडू हवेत मारता यायचा नाही. सरांच्या या शिकवणीतून आयुष्यात शॉर्टकट न घेता मानसिक दृष्टया सक्षम होण्याचा गुण अवगत झाल्याची आठवण सचिनने यावेळी सांगितली. चित्रकार कपिल भीमकर यांनी काढलेले चित्र देऊन सचिनचा यावेळी सत्कार करण्यात आला. अभिनेता संकर्षण कर्हाडे याने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तर इंद्रनील चितळे यांनी आभार मानले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घेणे आवश्यक
क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानामुळे आमुलाग्र बदल झाले. प्रतिस्पर्धी संघातील कच्चे दुवे, आपल्या खेळातील बारकावे शोधण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. माझ्या यशात देखील तंत्रज्ञानाचा वाटा आहे. त्यामुळे कामगिरी उंचावण्यासाठी प्रत्येक खेळाडू आणि संघांनी तंत्रज्ञानाचा फायदा करून घेणे आवश्यक आहे. खेळाबरोबरच व्यवसाय, उद्योग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचा सल्ला भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी दिला.