सेलिब्रिटी कपल म्हटलं की त्यांच्याबद्दल वाद, घटस्फोट अशा बातम्या येतच राहतात. पण घटस्फोटानंतर चर्चा रंगते ती अभिनेत्याकडून पत्नीला मिळणाऱ्या पोटगीची. कारण तेव्हा मात्र त्यांच्यातील ते प्रेम आदर काहिही दिसून येत नाही.
दावा केला जातो ते फक्त संपत्तीच्या वाटणीचा. पण यालाच अपवाद ठरलं आहे एक सेलिब्रिटी कपल. कारण एका अभिनेत्याने कशाचाही विचार न करता आपली करोडोंची संपत्ती आपल्या पत्नीच्या नावे केली आहे.
2250 कोटी रुपये इतकी गडगंज संपत्ती पत्नीच्या नावे
या अभिनेत्यानं घेतलेल्या एका निर्णयाचं कौतुक होत आहे. हा अभिनेता म्हणजे हॉलिवूड स्टार, जेट ली. त्यानं पत्नीवरील प्रेम व्यक्त करत आपली संपूर्ण संपत्ती तिच्या नावे केली आहे. जवळपास 37 वर्षांपासून आनंदी आणि सुखी वैवाहिक आयुष्याचा अनुभव घेणाऱ्या जेट लीनं तब्बल 200 मिलियन डॉलर, म्हणजेच साधारण 2250 कोटी रुपये इतकी गडगंज संपत्ती पत्नीच्या नावे केली आहे.
प्रेमाच्या नात्यात किंवा मुळातच नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेमच नव्हे, तर त्याग, समर्पण आणि सर्वात महत्त्वाचा विश्वास असणं म्हत्त्वाचं असतं. हा संदेशच जणू या कपलने इतरांना दिला आहे. एका मुलाखतीमध्ये जेट लीने आपल्या या निर्णयाचा खुलासा केला.
पत्नीने दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता
त्याने असं का केलं याचं कारणही यावेळी सांगितलंय, तो म्हणाला “पत्नीनं कायमच माझी साथ दिली आहे. परिस्थिती कशीही असो, ती कायमच माझ्यासोबत होती. जीवनातील कठीण प्रसंगातही तिची साथ मला मिळाली, ती माझ्या अनेक गोष्टींची काळजी घेते आणि याच कारणामुळं मी करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकतो. पत्नीच्या या समर्पणामुळेच मी करिअरमध्ये इतकं यश मिळवू शकलो. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे” असं म्हणत जेट लीनं असा निर्णय का घेतला हे सांगितले. तसेच त्याने घेतलेला हा निर्णय म्हणजे त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी केलेल्या त्यागाची दखल आहे असं त्यानं त्याचं म्हणणं मांडलं आहे.
नीना लीनेही स्वत:च्या करिअरपेक्षा कुटुंबाला दिलं महत्त्व
तसेच पत्नीच्या नावे संपत्ती करण्याचा निर्णय आपण कोणत्याही दडपणामुळं घेतला नसून, तिच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही माझी पद्धत असल्याचं जेट लीनं म्हटलं आहे. अभिनेता जेट ली याच्या पत्नीचं नाव नीना ली असून, तिच्या नावे मिस एशिया या किताबाचीही नोंद आहे.
जेट लीसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर ठेवत कुटुंबाला प्राधान्य दिलं. फक्त पत्नी म्हणूनच नव्हे, तर जेट ली ची असिस्टंट म्हणूनही तिने काम केलं.
नीनाच्या याच समर्पणासाठी जेट लीने अनोख्या पद्धतीनं प्रेमानं आणि जाणीवेनं ही मौल्यवान भेटही तिला दिली असं म्हणणं चुकिचं ठरणार नाही. पण या जोडीने नात्यातील विश्वास आणि प्रेम म्हणजे काय हे या प्रसंगातून दाखवत सर्वांसमोरच एक आदर्श निर्माण केला आहे.