पत्रकार परिषदेत बोलताना लॉयड्स मेटल्सचे कार्यकारी संचालक एस.एस.खंडवावाला.pudhari photo
Published on
:
02 Feb 2025, 3:22 pm
Updated on
:
02 Feb 2025, 3:22 pm
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (LMEL) वतीने येत्या ५ फेब्रुवारीपासून गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, क्रिकेट रसिकांना टी-२० सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
गुजरातचे माजी पोलिस महासंचालक तथा लॉयड्स मेटल्सचे कार्यकारी संचालक एस.एस.खंडवावाला यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खंडवावाला यांनी सांगितले की, गडचिरोली येथील एमआयडीसी (MIDC) मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ५ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. रवी शास्त्री यांना सन्मानित केल्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा मार्च पास्ट होणार आहे. यावेळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.
स्पर्धेचा पहिला साखळी सामना संध्याकाळी ५:०० वाजता सुरू होईल, ज्यात लॉयड्स संघ खेळणार आहे. दुसरा सामना रात्री ८:३० वाजता व ६ फेब्रुवारीपासून पुढील सर्व सामने वेळापत्रकानुसार होणार आहेत.
दररोज दिवस आणि रात्रकालीन सामने होणार असून पहिला सामना दुपारी ४ ते संध्याकाळी ७, दुसरा सामना संध्याकाळी ७.३० ते रात्री १०.३० वाजतापर्यंत होणार आहे. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांचे संघ तसेच पोलिस, वन, महसूल विभाग व लॉयड्स मेटल्स यांचे संघ सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला लॉयड्स मेटल्सचे संचालक कर्नल विक्रम मेहता, बलराम सोमनानी व रोमित तोंबर्लावार उपस्थित होते.
सामने पाहण्यास मोफत जाण्या येण्याची सोय
एमआयडीसी (MIDC) मैदानावरील सामन्यांचा थरार अनुभवता यावा, यासाठी लॉयड्स मेटल्सतर्फे मोफत ये-जा करण्याची सोय करण्यात आली आहे.
मैदान परिसरात स्टॉल, दुकाने लावण्याची व्यवस्था
स्पर्धेच्या परिसरात स्टॉल, दुकाने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांकडून मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे. ज्यांना दुकाने, स्टॉल लावायचे असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.