Published on
:
02 Feb 2025, 3:18 pm
Updated on
:
02 Feb 2025, 3:18 pm
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक निकाल आणि मतदार यादीतील अनियमिततेच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी 'ईगल' समिती स्थापन केली आहे. निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेसने ही समिती स्थापना केली. ही समिती महाराष्ट्र निवडणुकीच्या मतदार यादीतील फेरफाराची चौकशी करणार आहे आणि सर्व निवडणुकांवरही लक्ष ठेवणार आहे. ईगल समितीमध्ये महाराष्ट्रातून माजी मंत्री नितीन राऊत यांचा समावेश आहे.
काँग्रेसने वारंवार ईव्हीएममध्ये छेडछाडीचा आरोप केला आहे. मात्र निवडणूक आयोगाने वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावले. दरम्यान, ईगल समिती म्हणजे नेते आणि तज्ञांचा सक्षम कृती गट आहे. ही समिती निवडणूकनिहाय निकाल आणि मतदार याद्यांचे विश्लेषण करेल आणि पक्ष नेतृत्वाला या संबंधीचा अहवाल सादर करेल. 'ईगल' ला देण्यात आलेले पहिले काम महाराष्ट्र निवडणुकीबाबत आहे. महाराष्ट्रातील मतदार यादीतील फेरफाराच्या मुद्द्यावर ही समिती पक्षश्रेष्ठींना सविस्तर अहवाल सादर करेल.
'ईगल' समितीमध्ये यांचा समावेश
'ईगल' समितीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन, दिग्विजय सिंग, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अभिषेक सिंघवी, प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, पक्षाच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा, गुरदीप सिंग सप्पल, महाराष्ट्रातील माजी नितीन राऊत, चल्ला वामशी चंद रेड्डी यांचा समावेश आहे.
निवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असा आरोप काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांनी सातत्याने केला आहे. लोकसभा निवडणुका आणि अलिकडे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान हे आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीवरही काँग्रेसने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तसेच तक्रारही निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही 'ईगल' समिती स्थापन केली.