पाचव्या टी20 सामन्यात एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना अभिषेक शर्माचा झंझावात सुरु होता. संजू सॅमसनची विकेट गेल्यानंतर अभिषेक शर्माने आपले हात खोलले. येईल त्या गोलंदाजाला त्याच्या शैलीत उत्तर देत होता. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आणि शतक ठोकलं. त्यानंतर त्याचा झंझावात सुरुच होता. भारताने या सामन्यात पॉवर प्लेमध्ये 95 धावा करत रेकॉर्ड नोंदवला आहे. तसेच भारताने 6.3 षटकात म्हणजेच 39 चेंडूत शतक ठोकलं. तर अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतक ठोकत वेगवान शतकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्मा 54 चेंडूत 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 250 चा होता. भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं आहे. आता इंग्लंडचा संघ हे आव्हान गाठणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.
भारताने नाणेफेकीचा कौल गमवला आणि मनासारखंच झालं. भारताच्या वाटेला फलंदाजी आली आणि पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा दिसला. संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि पहिल्या षटकात 16 धावा आल्या. संजू सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने 15 चेंडूत 24 धावा केल्या. सूर्यकुमार यादव या सामन्यातही फेल गेला. त्याला फक्त 2 धावाच करता आल्या. पण शिवम दुबेने 13 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या माध्यमातून 30 धावा केल्या. हार्दिक पटेल आणि रिंकु सिंह प्रत्येकी 9 धावांवर बाद झाले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड