Published on
:
02 Feb 2025, 2:59 pm
Updated on
:
02 Feb 2025, 2:59 pm
नवी दिल्ली : "नेहरूंच्या काळात जर कोणी १२ लाख रुपये कमावले तर सरकार त्याच्या पगाराचा एक चतुर्थांश भाग कर काढून घेत असे. इंदिरा गांधींच्या काळात १२ लाख रुपये कमावलेल्या व्यक्तीचे १० लाख रुपये करात गेले असते," असे म्हणत कर सवलतीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील आरके पुरम येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला. केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक करताना ते म्हणाले की, ते मध्यमवर्गासाठी फायदेशीर हा अर्थसंकल्प आहे आणि काँग्रेस राजवटीत १२ लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला २.६ लाख रुपये कर भरावा लागत होता. मात्र केंद्रातील भाजप सरकारने १२ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. आमच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे. हा अर्थसंकल्प जनतेचा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, १० वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावर होती, आता ती ५ व्या स्थानावर पोहोचली आहे. जर पूर्वीची सरकारे असती तर देशाचे वाढते उत्पन्न कमी झाले असते. दिल्लीच्या 'आप' सरकारला लक्ष्य करताना "दिल्लीतील जनतेची ११ वर्षे वाया गेली आहेत. हे 'आप' सरकार नाही तर 'आपदा' सरकार आहे. मात्र आता दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.