खा. प्रफुल पटेल, खा. प्रशांत पडोळे, आ. नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगावच्या ऐतिहासिक शंकरपटाला सुरुवात झाली.Pudhari Photo
Published on
:
02 Feb 2025, 3:25 pm
Updated on
:
02 Feb 2025, 3:25 pm
भंडारा: लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील शंकरपटाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे. या ऐतिहासिक शंकरपटाला आज २ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. ५ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या या शंकरपटात ट्रॅक्टरसह दहा दुचाकी जिंकण्याची बैलपटाच्या शौकीनांना संधी आहे.
पिंपळगावचा या शंकरपटाचे हे शताब्दी महोत्सव असल्याने भंडारा जिल्ह्यासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, लातूर, मध्यप्रदेशातील शिवनी, बालाघाट या जिल्ह्यातील सुमारे ५०० बैलजोड्या सहभागी होणार आहेत. सुमारे पाच दिवसांपासून पटशौकीन व बैलजोड्या पिंपळगावात दाखल झाल्या आहेत. दुपारच्या सुमारास खा. प्रफुल पटेल, खा. प्रशांत पडोळे, आ. नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली बैलजोडी पटाच्या दाणीवर धावली. यावेळी हजारोंच्या संख्येने पटशौकीन, गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
पिंपळगाव येथील शंकरपटात विजेत्या बैलजोडीला प्रथम क्रमांक ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. दोन ते सात क्रमांकापर्यंत दुचाकी वाहन बक्षीस राहील. तर शेवटच्या जोडीला चार हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. शंभराव्या पटसभेचे नेतृत्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, सरपंच तथा स्वागताध्यक्ष श्याम शिवणकर व सर्व सदस्या ग्रामपंचायत पिंपळगाव हे करत आहेत.
या कार्यक्रमाला आ. नाना पटोले, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, भंडारा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, पिंपळगावचे सरपंच श्याम शिवणकर, जिल्हाधिकारी संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, पोलिस पाटील मते, गावकरी व पटशौकीन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.