Published on
:
02 Feb 2025, 9:40 am
Updated on
:
02 Feb 2025, 9:40 am
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला जोडणारे प्रस्तावित रस्ते, पूल अन् इमारती तसेच विश्रामगृहे, हॅलिपॅड तसेच विद्युत जोडणी यांच्या बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुमारे 3 हजार 3345 कोटींचा आराखडा शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अरुंधती शर्मा यांनी दिली.
नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांच्यासमोर शनिवारी (दि. 31) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सिंहस्थ कामकाजाचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अधीक्षक अरुधंती शर्मा यांनी पीपीटीद्वारे पालक सचिव डवले यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली. सिंहस्थ कुंभासाठी कोट्यवधी भाविक येणार असल्याने रस्त्यांच्या निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. आराखड्यानुसार जिल्ह्यामध्ये एकूण 759.25 किलोमीटरच्या एकूण 52 रस्त्यांची बांधणी प्रस्तावित आहे. यासाठी 3050.55 कोटी रुपय खर्च येणार आहे. तर 37 इमारतींचे नूतनीकरण प्रस्तावित असून 3 नवीन इमारती बांधण्याचे नियोजन आहे. यासाठी 171.39 कोटी खर्च अपेक्षित आहे. कुंभासाठी येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेता शहरात गर्दी होऊ नये यासाठी महापालिका क्षेत्राबाहेर स्वतंत्र 13 वाहनतळे उभारण्यात येणार आहे. यासाठी 82.25 कोटींचा खर्च करावा लागणार आहे. इतर आनुषंगिक कामांसाठी जसे की, 6 हेलिपॅडची निर्मिती व इतर आनुषांगिक कामांसाठी 4 कोटी तर सा.बां. विद्युत विभागासाठी 36.54 कोटी खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये या कामांसाठी 660 कोटींची तरतूद करण्यात आली होती.
नाशिकमध्ये दोन वर्षांनी साजर्या होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासकीय स्तरावर हालचालींना वेग आलेला आहे.Pudhari News Network
नाशिकमध्ये दोन वर्षांनी साजर्या होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासकीय स्तरावर हालचालींना वेग आलेला आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कुंभमेळामंत्री गिरीष महाजन, पालक सचिव डवले यांच्याकडून सातत्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजांचा आढावा घेण्यात येत आहे. सिंहस्थाशी संबंधित सर्व विभागांनी आराखडा तयार केला असून तो शासनाला सादर करण्यात आला आहे. केंद्र सरकार आणि राज्यशासनाकडून याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. निधीची व्यवस्था झाल्यानंतर सिंहस्थाची कामे त्वरित सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.