जळगाव शहर वाहतूक शाखेकडून जानेवारी महिन्यामध्ये वाहतूक सुरक्षा महिना राबविण्यात आला. (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
:
01 Feb 2025, 5:35 am
Updated on
:
01 Feb 2025, 5:35 am
जळगाव : जानेवारी महिन्यामध्ये वाहतूक सुरक्षा महिना राबविण्यात आला. जळगाव शहर वाहतूक शाखेकडून याचे आयोजन करण्यात आले होते. या महिन्याभरात विभागाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात आले. पथनाट्य, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवार (दि.31) सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जळगाव शहर पोलीस वाहतूक शाखेकडून 1 जानेवारी ते 31 जानेवारी हा संपूर्ण महिना वाहतूक सुरक्षा महिना म्हणून पाळण्यात आला. या महिन्यांमध्ये वाहतूक शाखेकडून जळगाव शहरातील 32 शाळांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये प्रत्येक शाळेतून चार विद्यार्थ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शहरातील मुख्य चौका चौकांमध्ये पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यामधून नागरिकांना व वाहनचालकांना वाहतूक सुरक्षिततेबाबत व त्यांच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
"सुरक्षेचे घडती संस्कार, संगतीला रंग कुंचल्यांचा आधार" या घोषवाक्याने मुलांनी चित्रकला स्पर्धेत वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. (छाया : नरेंद्र पाटील)
वाहतुकीचे नियमांबाबत जनजागृती करण्याबरोबरच अल्पवयीन मुले वाहने चालवत असताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बुलेटमध्ये व इतर वाहनांचे सायलेन्सर बदलून कर्कश आवाज निर्माण करणाऱ्या मोटर सायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट सक्तीचा नियम लागू करण्यापूर्वी पोलिसांपासून तर पत्रकारांपर्यंत हेल्मेटसक्ती करण्यात आली. त्यानंतर महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आलेले आहे
शुक्रवार (दि.31) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील स्केटिंग ग्राउंडवर सांगता कार्यक्रमामध्ये वाहन निर्माणचे प्रदर्शन, विविध प्रकारच्या नंबर प्लेट, सायलेन्सर हे प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेले होते. या ठिकाणी हेल्मेटवर जनजागृतीचा कार्यक्रम व पथनाट्य ओरिएंट सिमेंटकडून सादर करण्यात आले. डीवायएसपी संदीप गावित यांनी प्रस्तावना केली. यावेळी स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद डॉक्टर महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.