राजगड-तोरणा जोडणारा रस्ता करा; भगवान पासलकर यांची अजित पवार यांच्याकडे मागणीPudhari
Published on
:
01 Feb 2025, 7:26 am
Updated on
:
01 Feb 2025, 7:26 am
खडकवासला: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या तोरणागड व स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ले जवळच्या अंतराने जोडणार्या शिवकालीन वहिवाटीचा पाल खुर्द ते मेटपिलावरे रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक रहिवासी व शिवभक्तांनी केली आहे .
पुणे जिल्हा सहकारी दूध संघांचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी शुक्रवारी (दि. 31) उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. राजगड किल्ल्याच्या पायथ्याच्या पाल खुर्द येथील गडाच्या पायर्या पासून तोरणागडाच्या पायथ्याच्या मेटपिलावरे येथील गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत शिवकालीन वहिवाटीचा रस्ता आहे. जिल्हा दूध संघांचे अध्यक्ष पासलकर म्हणाले, दोन्ही गड चढाईस बिकट आहेत. त्यामुळे पायर्यां पर्यंत रस्ता झाल्यास पर्यटकांची गैरसोय दूर होईल.
रस्त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढणार आहे त्यामुळे पर्यटनाला चालना मिळुन स्थानिक शेतकरी, युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवकालीन पायी वहिवाटीचा मार्ग वनक्षेत्रात आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्या प्रमाणे वनविभागाच्या सहकायार्ने दोन्ही गडाच्या पायर्याखाली वाहनतळ उभारण्यात यावा, असे पासलकर यांनी सांगितले.
राजगडचे पुरातत्व विभागाचे पाहरेकरी बापु साबळे म्हणाले, गडाच्या पायर्या पर्यंत रस्ता झाल्यास आपत्तीकालीन परिस्थितीत जखमी पर्यटकांना तातडीने उपचार उपलब्ध होणार आहेत. बिकट पाऊल वाटेने गंभीर जखमी पर्यटकांना गडाच्या पायथ्याशी आणण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही.