नाडी परीक्षणासाठी इच्छुकांच्या रांगाFile Photo
Published on
:
01 Feb 2025, 9:36 am
Updated on
:
01 Feb 2025, 9:36 am
पुणेः ‘आयुर्वेद’ या प्राचीन भारतीय वैद्यकीय पद्धतीची जनजागृती करण्यासाठी आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशनच्या वतीने डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते आज सकाळी झाले.
आयुर्वेदिक उपचार पद्धती परिणामकारक असून, त्याचे साईड इफेक्ट्सही नाहीत, याचा अनुभव आपण घेतला असल्याचे तापकीर यांनी यावेळी सांगितले. असोसिएशनचे अध्यक्ष शेखर खोले, महोत्सव समितीचे अध्यक्ष अभय देव, सचिव मुरलीधर कातोरे, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार अक्कलकोटकर आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रदर्शनात योग, प्राणायाम, आयुर्वेदिक जीवनशैली, स्त्रीयांचे विकार व इतर अनेक आजारांवर प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सल्ला व मोफत रोग निदान तसेच मोफत नाडी परीक्षणाची सोय करण्यात आली असून, येथील नाडी परीक्षणाला आज पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारहून अधिक नागरिकांनी नाडी परीक्षण सुविधेचा लाभ घेतल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार अक्कलकोटकर यांनी सांगितले.
प्रदर्शनात आयुर्वेद औषधींचे 70 ते 72 स्टॉल्स लावण्यात आले असून, तेथे प्रसिद्ध कंपन्यांची आयुर्वेदिक उत्पादने सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. प्रदर्शनानिमित्त चर्चासत्र व व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे.
आज आयुर्वेद उत्पादन क्षेत्रातील संधी, आयुर्वेद क्षेत्रात प्रॅक्टीस व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या इतर संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रदर्शन रविवार (दि. 3 फेब्रुवारी) पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार असून, या दोन दिवसांतही आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड, ड्रग मॅजिक रेमिडी अॅक्ट, आयुर्वेदाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आदी विषयांवर चर्चासत्रे व व्याख्याने होणार असल्याचे अक्कलकोटकर यांनी सांगितले.