राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार हे कायमच त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. ते अनेकदा कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांचीही फिरकी घेत असतात. तर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते धारेवर धरत असतात. आता नुकतंच एका बँकेच्या मॅनेजरला अजित पवारांनी चांगलंच सुनवलं आहे. ते आज बारामती दौऱ्यावर होते.
अजित पवारांनी नुकतंच बारामतीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्धाटन केले. यावेळी अजित पवारांनी बँकेच्या मॅनेजरला एक सवाल केला आहे. “आप पान खाते हो क्या? हमें बेवकुफ समजे क्या?” असा सवाल अजित पवारांनी विचारला. त्यानंतर त्यांनी व्यसनाने कॅन्सर होतो असे त्याला सांगितले. यानंतर त्यांनी भाषण केले.
“बारामतीमध्ये विकास कामांचा डोंगर उभा”
“आज अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मला तो अर्थसंकल्प ऐकायचा आहे. संपूर्ण जनतेचा तो अर्थसंकल्प असेल. मला पुन्हा पाच वर्षांची संधी दिली. त्यामुळे देशात बारामती एक नंबरचा तालुका बनवणार आहे. बारामतीत जनावरांसाठी सुसज्ज दवाखाने तयार करणार आहे. बऱ्हाणपूरमधील पोलीस उपमुख्यालयात वृक्षारोपण गरजेचे आहे. बारामती देशातील आदर्श शहर करायचं आहे. दर्जेदार काम करणं ही माझी जबाबदारी आहे. बारामतीमध्ये विकास कामांचा डोंगर उभा करत आहोत. कायदा-सुव्यवस्था काम चांगले राहावे म्हणून चार स्कार्पिओ गाड्या पोलिस ताफ्यात दिल्या आहेत”, असे अजित पवार म्हणाले.
“ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या”
“केंद्रीय सरकारने अर्थ संकल्प मांडला आहे. मला ऐकायचा होता. पण कामाच्या व्यस्त नियोजनामुळे ऐकता आले नाही. मात्र अर्थ संकल्प जनतेच्या मनातील असेल. ओबीसीला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे. नुसते कागद वाचून उपयोग नाही. माणसं पाहिले पाहिजेत. शेतकऱ्यांकडून विहिरीच्या कामासाठी कोणी पैसे घेत असेल तर त्यांचं काही खरं नाही”, असा दमही अजित पवारांनी भरला.
“बारामतीमध्ये अतिक्रमण करत असतील तर ते काढा”
“बारामती सुसज्ज शौचालय उभारणार आहे. बारामती विकासासाठी तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. पुरंदर विमानतळासाठी काहींची नाराजी घ्यावी लागेल. कोणी बारामतीमध्ये अतिक्रमण करत असतील तर ते काढा. विश्वासार्ह असलेल्या बॅंकेत पैसे किंवा ठेवी ठेवा. राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवा. बारामतीच्या विकासासाठीच आपल्याला ही जागा भाड्याने दिली आहे”, असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले.