नृसिंहवाडी येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी नवदांपत्य व संयोजक.Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:07 pm
Updated on
:
01 Feb 2025, 1:07 pm
नृसिंहवाडी : आजकाल गोरगरीब लोकांना महागाईमुळे विवाह करणे परवडत नाही हे ओळखून मारवाडी युवा मंच इचलकरंजी यांच्या वतीने आणि नृसिंहवाडी येथील दत्त छाया मंगल कार्यालयाच्या पुढाकार्याने मोठ्या संख्येने जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी मारवाडी युवा मंचच्या वतीने नवदंपत्यांना संसार सेट, मंगळसूत्र, जोडवी, पैंजण, कपाट सेट, पोशाख असा सुमारे एक लाख रुपयेचा आहेर देण्यात आला. याचबरोबर या नवदांपत्याबरोबर येणाऱ्या 25 पाहुण्यांना पक्वानांचे भोजन देण्यात आले. सुमारे एक हजार लोकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला. गरीब गरजू होतकरू नवदम्पत्यांनी अगदी घरच्यासारखा विवाह सोहळा पार पडल्याची भावना यावेळी व्यक्त केली. वाजंत्री तसेच सजलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. अक्षता फुलांची उधळण सनई चौघडा यामुळे या विवाह सोहळ्याला एक वेगळे मंगलमय स्वरूप प्राप्त झाले होते.
या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन मिरजेचे डीवायएसपी प्रणित मिलडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश सेवा समिती अध्यक्ष द्वारकाधीश सारडा उपस्थित होते. या सोहळ्याला यंत्रमाग महामंडळ अध्यक्ष अशोक स्वामी, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. हा सामुदायिक धार्मिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी मारवाडी युवा मंचच्या प्रांतीय उपाध्यक्ष रेखा सारडा, कविता डाळ्या, सुनील जोशी, माधुरी लाहोटी, तनवी तोष्णीवाल, दयानंद कुमठेकर, उषा दरक, पुनम बालदी ,ममता पुत आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.