प्रातिनिधिक छायाचित्रfile photo
Published on
:
01 Feb 2025, 1:15 pm
Updated on
:
01 Feb 2025, 1:15 pm
पिंपरी : दूषित पाण्यामुळे गुलेन बॅरी सिंड्रोमचा (जीबीएस) होत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नळाद्वारे, टँकरद्वारे तसेच जारद्वारे पुरविण्यात येणार्या पाण्याचे नमुने पाणीपुरवठा विभागाकडून घेतले जात आहेत; मात्र या उपाययोजना तोकड्या पडत आहेत.
विहीर आणि टँकरचे पाणी केवळ वापरासाठी उपयोगात आणण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. टँकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी पिण्यासाठी नसल्याचा बोर्ड संबंधितांना लावण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, शहरामध्ये टँकर, जार यांच्या माध्यमातून देण्यात येणार्या सर्व पाण्याचे नमुने पाणीपुरवठा विभागाला घेणे शक्य होत नसल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे.
शहरामध्ये जीबीएसच्या एकूण 15 संशयित रुग्णांपैकी 6 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, जीबीएस बाधित 36 वर्षीय तरुणाचा महापालिकेच्या पिंपरी - संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तथापि, न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे कारण वायसीएम रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने दिले आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या उपाययोजना
पाणीपुरवठा विभागाकडून चर्होली, मोशी, डुडूळगाव, पिंपळे गुरव अशा विविध भागांमध्ये पाण्याचे नमुने घेतले जात आहेत.
पिण्याच्या पाण्याचे आत्तापर्यंत एकूण 1661 नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. विहीरीतून टँकरमध्ये भरण्यात येणार्या पाण्याच्या ठिकाणांवर आत्तापर्यंत 41 नमुने घेतले आहेत. पाण्याचे जार जिथे भरलेले जातात त्या केंद्रांवर एकूण 20 ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले आहेत. टँकरचालकांना पाणीपुरवठा विभागाकडून ब्लिचींग पावडर दिली असून त्यांना ती पाण्यामध्ये टाकण्यास सांगितली आहे. टँकरचे पाणी पिण्यासाठी न वापरता वापरासाठी असल्याचे बोर्ड टँकरला लावण्याबाबत सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.
वैद्यकीय विभागाच्या उपाययोजना
* सर्वेक्षणासाठी 8 रुग्णालय झोन अंतर्गत एकूण 16 पथके तैनात
* पथकांमार्फत 10 हजार 718 घरे तपासण्यात आली. त्यामध्ये नव्याने एकही जीबीएसबाधित रुग्ण आढळलेला नाही.
* या आजारावर उपचारासाठी आवश्यक औषधोपचार महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह अन्य महापलिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
* या आजाराचे एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहे. वायसीएम आणि नवीन थेरगाव रुग्णालयात या योजनेतंर्गत संबंधित रुग्णांसाठी मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे.