शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाची पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील Pudhari News Network
Published on
:
01 Feb 2025, 11:06 am
Updated on
:
01 Feb 2025, 11:06 am
जळगाव : जळगावात जीबीएस आजार आढळलेल्या महिला रुग्णांची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
राज्यभरात गुइलेन बैरे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही "ट्रॅव्हल्स हिस्ट्री" नसताना मात्र एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु असलेल्या या महिलेच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी (दि.1) रोजी दुपारी दीड वाजता आले.
रुग्णाच्या स्थितीबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे तथा औषधवैद्यक शास्त्र विभागाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ.अभिजीत पिल्लई यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती दिली. सदर महिला रुग्णांवर वेळोवेळी योग्य ते उपचार सुरू ठेवावेत. आवश्यक ती मदत महिला रुग्णाच्या नातेवाईकांना करावी. यानंतर देखील आणखी रुग्ण आढळल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवून रुग्णांची सातत्याने काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.
जीबीएस महिलेने कोणताही प्रवास केलेला नाही किंवा या महिलेची ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तसेच, राहत्या घरीच हि अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती न्यूरॉलॉजिस्ट डॉ. अभिजित पिल्लई यांनी दिली. वैद्यकीय पथक रुग्णाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवत आहे. यावेळी अतिरिक्त शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. इम्रान पठाण उपस्थित होते.
जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे
अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा
अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी
डायरिया (जास्त दिवसांचा)
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे.
अन्न स्वच्छ आणि ताजे असावे
वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा
शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल