ऑस्ट्रेलियाचं कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व पाहिलं गेलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. असं असताना ऑस्ट्रेलियासाठी 1 फेब्रुवारी हा खास दिवस ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे, वुमन्स एसेज कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकमात्र कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे या ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही संघानी जवळपास एकाच वेळी सामने जिंकले आणि एक सारखाच निकाल पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने श्रीलंकेला एक डाव आणि 242 धावांनी पराभूत केलं. हा सामना 4 दिवसही चालला नाही. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पहिल्या डावात 6 गडी गमवून 654 धाव धावा केल्या. पण श्रीलंकेला या धावांचा पाठलाग करणंच कठीण झालं. पहिला डाव 165 धावांवर आटोपला आणि फॉलोऑनची नामुष्की ओढावली. तर दुसऱ्या डावात फक्त 247 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे एक डाव आणि 242 धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात उस्मान ख्वाजाने द्विशतीक खेळी केली. त्याने पहिल्या डावात 232 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथनेही शतक ठोकलं. त्याने 141 धावा केल्याय तर जोश इंग्लिसने 94 चेंडूत 102 धावांची खेळी केली. दुसरीकडे गोलंदाजीत मॅथ्यू कुह्नेमन याने श्रीलंकेचं कंबरडं मोडलं. त्याने पहिल्या डावात श्रीलंकेचे 5 गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात 4 गडी बाद करण्यात यश आलं. नाथन लायन यानेही चांगली कामगिरी केली आणि या सामन्यात एकूण 7 विकेट बाद केले.
पुरुष संघाप्रमाणे ऑस्ट्रेलियन महिला संघानेही इंग्लंडला एक डाव आणि 122 धावांनी पराभूत केलं. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करतना 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त फलंदाजी केली आणि 440 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 270 धावांची आघाडी होती. ही आघाडी मोडून विजयासाठी धावा देण्याचं इंग्लंडपुढे आव्हान होतं. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ 148 धावांवर बाद झाला. यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि 122 धावांनी जिंकला.