विभागीय व्यवस्थापक हिंमत मीना यांची ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा तथा उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी भेट घेऊन उपनगरीय रेल्वेच्या समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा केली.(छाया: बजरंग वाळुंज)
Published on
:
02 Feb 2025, 4:42 am
Updated on
:
02 Feb 2025, 4:42 am
डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील देसाई खाडीवर नवीन पूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. देसाई खाडी ते काटई हा नवीन पूल तयार झाल्याशिवाय काटई निळजे रेल्वे उड्डाणपूल बंद करू नये, याकडे मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा तथा उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना कल्याण-शिळ महामार्ग पाच दिवसांसाठी बंद केल्यास हाहाकार माजणार, या महामार्गावरचा सारा भार मध्य रेल्वेमार्गावर येणार आणि वाढत्या गर्दीमुळे नाहक बळी जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी मध्ये रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिंमत मीना यांना निवेदन सादर करत कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला काटई-निळजे रेल्वे उड्डाणपूल 5 ते 10 फेब्रुवारी पर्यंत रेल्वे कॉरिडॉरसह दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची नोटीस काढली आहे.
वास्तविक पाहता कल्याण-शिळ महामार्गावर दररोज वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. या कोंडीमध्ये प्रवासी वाहने, रूग्णवाहिका, शाळांच्या बसेस वारंवार अडकून पडत आहेत. मेट्रोच्या कासवछाप अनागोंदी कारभारामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडत आहे. त्यातच दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. वाहतूक नियंत्रण विभागाने सुचविलेले पर्यायी रस्ते प्रवाशांसाठी काहीही फायद्याचे नाहीत. अशावेळी काटई-निळजे पूल दुरूस्तीसाठी 5 दिवस बंद केल्यास सर्वांचेच हाल होणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक समस्येचा व पर्यायी रस्त्यांचा संपूर्ण आढावा घ्यावा. तसेच देसाई निळजे ते काटई (पलावा चौक एक्सपरिया मॉल साईड) चे एमएसआरडीसीकडून सुरू असलेले उड्डाणपूल पूर्ण झाल्याशिवाय काटई-निळजे पूल कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, याकडे नेते राजू पाटील यांनी रेल्वेचे लक्ष वेधले आहे.
पुलाच्या कामाकरिता 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत या 5 दिवसांसाठी कल्याण-शिळ महामार्ग बंद केल्यास या मार्गाने ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईकडे जाणारा चाकरमानी, व्यावसायिक आणि विद्यार्थी रेल्वे मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणार. आधीच प्रचंड गर्दीमुळे डोंबिवलीकर चालत्या लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडत असतात. त्याची संख्या या पाच दिवसात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व टाळण्याकरिता या पाच-सहा दिवसांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या आणि डोंबिवलीकडे येणाऱ्या विशेष चार ते पाच लोकल सोडण्यात याव्यात. किंवा सकाळी व सायंकाळी पिक अवर्समध्ये कल्याण-शिळ महामार्गावरील रेल्वेच्या उड्डाण पुलाचे काम थांबवून रात्री आणि दुपारच्या वेळेत करावे. अन्यथा गर्दीमुळे नाहक डोंबिवलीकरांचा बळी जाईल, अशीही खंत लता अरगडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या पार्श्वभूमीवर गुरूवारी (दि.30) बदलीने मध्य रेल्वे प्रशासनात स्थानापन्न झालेले विभागीय व्यवस्थापक हिंमत मीना यांची ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा तथा उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी भेट घेऊन उपनगरीय रेल्वेच्या समस्यांबाबत निवेदनाबाबत चर्चा केली आहे.
काटई-निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल बंद ठेवणार
या भेटीदरम्यान काटई-निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल दुरूस्तीसह कॉरिडोर कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याकडे लक्ष वेधले. तथापी याचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर होऊन प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यामुळे चालत्या लोकलमधून प्रवासी पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्याकरिता या कालावधीत डोंबिवली ते सिएसएमटीदरम्यान सकाळी आणि सायंकाळी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर डीआरएम हिंमत मीना यांनी माहिती घेऊन प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षेसाठी उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.