Published on
:
07 Feb 2025, 5:23 am
Updated on
:
07 Feb 2025, 5:23 am
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या ग प्रभाग क्षेत्रातील निवासी व बिगर निवासी मालमत्तांचे कर थकबाकी प्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. वारंवार नोटीसा देऊनही कर भरणा करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकी धारकांच्याविरोधात गुरूवारी दिवसभरात त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली.
आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी यांनी ही कारवाई केली. या कारवाई अंतर्गत डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा रोडला असलेल्या पांडुरंगवाडीतील गणेश सिद्धी इमारतीमधील ब्लॉक क्र. 301 आणि 401 हे दोन्ही फ्लॅट 2 लाख 41 हजार 691 रूपये इतक्या थकबाकीमुळे सील करण्यात आले. तसेच ओम शिवगणेश सोसायटीतील विकासक पी. एस. म्हात्रे यांचे कार्यालय 26 लाख 31 हजार 705 रूपये इतक्या थकबाकीमुळे सील करण्यात आले. केडीएमसीच्या आक्रमक कारवाईमुळे अन्य थकबाकीदारांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र लवकरच मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल होण्याची शक्यता देखिल वर्तविण्यात येत आहे.