लातूर (Latur):- चारचाकी गाड्याना थांबवून प्रवाशांना धमकावून जबरदस्तीने सोन्याचे दागिने (Gold ornaments) चोरणाऱ्या तीन आरोपींना 6 लाख 76 हजार रुपयांचे 9.4 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली..
पावणे सात लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी!
काही दिवसांपूर्वी रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लातूर ते रेणापूर रोडवर बोरवटी गावाजवळ अज्ञात आरोपींनी कारमधून जाणाऱ्या दांपत्याना अडवून, धमकी व धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यावरून रेणापूर ठाण्यात कलम 309 (4), 351(2), 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता व 392, 32 भादंविप्रमाणे 2 गुन्हे दाखल झाले होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार नेमून त्याच्या मार्फत अज्ञात आरोपीचा शोध चालविला होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सदर आरोपींना शुक्रवारी (दि.17) त्यांच्या राहत्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.
तसेच गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे 9.4 तोळे वजनाचे 6 लाख 76 हजार रुपयाचे दागिने हस्तगत केले. आरोपी अमोल सुभाष राठोड (वय 27 वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा तालुका रेणापूर), अभय उर्फ राहुल संतोष चव्हाण, (वय 21 वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा तालुका रेणापूर) व कृष्णा राजूभाऊ ढमाले, (वय 25 वर्ष, रा. बोरवटी तालुका जिल्हा लातूर) यांना ताब्यात घेवून रेणापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.