वृद्धेला माजी सरपंचाकडून मारहाण File Photo
Published on
:
18 Jan 2025, 9:50 am
Updated on
:
18 Jan 2025, 9:50 am
भोजदरीच्या माजी सरपंचाने दारूच्या नशेत शिवीगाळ करत कुर्हाडीच्या दांड्याने 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेला जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार दि.16 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
भोजदरी गावातील 70 वर्षीय वयोवृद्ध महिला नर्मदाबाई रामा हांडे यांचे पतीचे निधन झाले आहे.तिचा मुलगा व सून शिक्षक असून ते मुंबई येथील मुंब्रामध्ये नोकरी करतात. परंतु गावचे माजी सरपंच मारुती उमाजी हांडे ही व्यक्ती त्यांचेच भावकीतील असून, गेली चाळीस वर्षांपासून नर्मदाबाई यांना नाहक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत आहे. गुरुवार 16 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नर्मदाबाई तिचे घराचे छतावर उभी होती.
यावेळी गावातील रस्त्याने माजी सरपंच मारुती हांडे दारूच्या नशेत त्याचे हातात लाकडी दांडा असलेली कुर्हाड घेऊन चालला होता. त्याने या वयोवृद्ध महिलेकडे पाहून थुंकला व म्हणाला की तुझे बापाचे आहे काय, तू येथे कशाला येते. दरम्यान, नर्मदाबाईंचा नातेवाईक आले म्हणून त्या खाली गेल्या असताना मारुती हांडे परत आला व कुर्हाड लाकडी दांड्याने डोक्यावर, डाव्या खांद्यावर, पाठीत मारहाण करून जखमी केले. या वेळी नर्मदाबाईला भुरळ आली. त्या पाणी पिण्यासाठी दादाभाऊ भारती यांचे घरी गेल्या असता तिथेही वेळूची काठी घेऊन मारुती आला व ‘कोणी लपवून ठेवली म्हातारी’ अस म्हणत पुन्हा मारहाण केली. तुझे बापाचे इथ काही नाही. म्हातारे तू येथे राहिलीस तर तुला जिवे ठार मारील, अशी धमकी दिली. तर म्हातारीला कोणी पोलिस स्टेशनला न्यायचं नाही, असा येथील नागरिकांना दम दिला.
नर्मदाबाई रामा हांडे यांचे फिर्यादीनुसार माजी सरपंच मारुती उमाजी हांडे याने दारूच्या नशेत शिवीगाळ करत कुर्हाडीचे व वेळूचे काठीने,लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी विविध कलमान्वये घारगाव पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.