यवतमाळः अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार File photo
Published on
:
18 Jan 2025, 12:59 pm
Updated on
:
18 Jan 2025, 12:59 pm
यवतमाळ : मित्राच्या वाढदिवसाचे जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात व्यक्तीने मृतदेह व दुचाकी महामार्गालगत असलेल्या नालीमध्ये टाकल्याने अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते मुडाणा दरम्यान असलेल्या लुटे यांच्या शेताजवळ शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
महागाव तालुक्यातील वाकोडी येथील अर्जुन गजेंद्र देशमुख (वय १९) व अजय सतीश विरखेडे (वय २२) हे शुक्रवार दि. १७ जानेवारीला रात्री आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जेवणाच्या पार्टीसाठी नांदगव्हाण येथील जगीरा धाब्यावर गेले होते. जेवण करून परत येत असताना नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते मुडाणा दरम्यान असलेल्या लुटे यांच्या शेताजवळ मध्यरात्री अज्ञात वाहनाने घडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने वाहनातील अज्ञात व्यक्तीने दोन्ही युवकांचे मृतदेह व दुचाकी काही अंतरावर असलेल्या नालीमध्ये टाकून घटनास्थळावरून पोबारा केला.
ही घटना आज शनिवारी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती महागाव पोलीस व नातेवाईकांना दिली. यानंतर नातेवाईक व महागाव ठाणेदार धनराज निळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह अपघातस्थळावरून महामार्गालगत असलेल्या शेतातील नालीत टाकण्यात आल्याने शंकेला वाव निर्माण झाली आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.