वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती. भारताने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न गमवता धडक मारली होती. पण भारताच्या पदरी अंतिम फेरीत निराशा पडली. त्यानंतर टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतरचा काळ टीम इंडियासाठी काही चांगला गेला नाही. गेल्या काही दिवसात वनडे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. टीम इंडियात काही व्यवस्थित नसल्याची चर्चाही सुरु झाली आहे. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर करताना दिरंगाई झाल्याचं पाहून चर्चांना उधाण आलं. पण अखेर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघ जाहीर केला. यात संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी संघात चार महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. यात आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याचा नावाचा विचार झाला नाही.
इशान किशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडल्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही विचार झालेला नाही. शार्दुल ठाकुर यालाही वगळण्यात आलं आहे. टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही संघात स्थान मिळालेलं नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. या चौघांऐवजी संघात ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वील आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, इंग्लंड मालिकेसाठी बुमराहऐवजी हार्षित राणाला संधी देण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (फीटनेस), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग,यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
वनडे वर्ल्डकप 2023 भारताचा संघ असा होता : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि शार्दुल ठाकुर.