सतीश चव्हाण पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत:शरद पवार गटाला काही महिन्यांतच सोडचिठ्ठी; शिर्डी येथील अधिवेशनात परतले स्वगृही

3 hours ago 1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या सतीश चव्हाण यांनी शनिवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश केला. या घटनाक्रमामुळे शरद पवार गटाला जबर झटका बसला आहे. विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्यावर 6 वर्षांची निलंबनाची कारवाई केली होती. पण सतीश चव्हाण यांनी पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार ते आज राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील अधिवेशनाला हजर राहून पक्षात प्रवेश केला. अजित पवार व सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षप्रवेशापूर्वी 6 वर्षांचे निलंबन मागे दुसरीकडे, सतीश चव्हाण यांच्या पक्षप्रवेशापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्यावरील 6 वर्षांच्या निलंबनाची कारवाई रद्दबातल केली होती. ते यासंबंधी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सतीश चव्हाण यांना 15 ऑक्टोबर 2024 रोजी पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. पण आता सतीश चव्हाण यांनी 13 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे ध्येय आणि धोरण यावर विश्वास व्यक्त करत प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील 6 वर्षांची निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. सतीश चव्हाण 1984 पासून राजकारणात सक्रिय सतीश भानुदासराव चव्हाण हे मेकॅनिकल इंजिनिअरचे पदवीधर आहेत. त्यांनी 1977 पासून दिवंगत वसंतराव काळे यांच्यासोबत विविध क्षेत्रांत काम केले. त्यानंतर 1984 पासून ते राजकारणात सक्रिय झाले. 2008 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर पाठवले. तेव्हापासून ते विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सतीश चव्हाण यांनी शासनाच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. सध्या ते विधानपरिषदेच्या न्याय निर्णय समितीचे सदस्य, सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाचे सदस्य आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक महामंडळाचे ते सरचिटणीसही आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article