बीसीसीआयने टीम इंडियात जागा मिळवायची असेल तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करा, असा निकष ठेवला आहे. या निकषात बसूनही करूण नायरचं नशिब फुटकं निघालं आहे. टीम इंडियात जागा मिळवणं त्याच्यासाठी कठीण झालं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरचं बॅट चांगली तळपली आहे. 50 षटकाच्या या स्पर्धेत त्याने एका पाठोपाठ एक शतकं झळकावली आहेत. मात्र आयसीसी स्पर्धेसाठी करूण नायरचा विचार झालेला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. करुण नायरने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती. पहिल्या कसोटी त्रिशतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. पण त्यानंतरही त्याला टीम इंडियात हवी तशी संधी मिळालेली नाही. पण विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करून त्याने लक्ष वेधून घेतलं होतं. पण पुन्हा एकदा त्याच्या पदरी निराशा पडली आहे.
करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. लिस्ट ए स्पर्धेत नाबाद राहून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. उपांत्य फेरीत महाराष्ट्र विरूद्धच्या सामन्यात करुण नायरने 44 चेडूंत नाबाद 88 धावा केल्या होत्या. याच स्पर्धेत करुण नायरने नाबाद 112, नाबाद 44, नाबाद 163, नाबाद 111, 112, नाबाद 122 आणि नाबाद 88 धावा केल्या आहेत. त्याने सात सामन्यात 752 धावा केल्या आहेत. यात सहावेळा नाबाद राहिला आहे हे विशेष.. करुण नायरची खेळी पाहता तो जबरदस्त फॉर्मात आहे. पण फॉर्मात असूनही त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार झालेला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात करुण नायर कर्णधार असलेल्या विदर्भ संघाने नाणेफेक जिंकली. तसेच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करुण नायर कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (फीटनेस), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग,यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.