Published on
:
18 Nov 2024, 8:17 am
Updated on
:
18 Nov 2024, 8:17 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मतदानाच्या दिवशी उमेदवारांकडून मतदान केंद्रांबाहेर उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाबाबत निवडणूक विभागाने नव्याने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना हे कार्यालय मतदान केंद्राच्या २०० मीटर त्रिज्येबाहेर उभारावे लागणार आहेत. तसेच या कार्यालयामध्ये केवळ एक टेबल, दोन खुर्चा आणि उमेदवाराचे एकच बॅनर लावता येणार आहे.
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र आणि मतदान केंद्राच्या बाहेर कशा प्रकारची व्यवस्था राहावी, याबाबतचे दिशानिर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्याच प्रकारचे निर्देश दिले आहेत.
मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांना मतदान केंद्रापासून २०० मीटर परिघाच्या आत त्यांचे तात्पुरते कार्यालय उभारता येणार नाही. २०० मीटर परिघा बाहेर तात्पुरते कार्यालय उभारता येईल. मात्र त्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यक त्या शासकीय प्राधिकरण, स्थानिक प्राधिकरण यांच्या परवानग्या घेणे बंधनकारक राहिल. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मतदान केंद्राबाबतच्या सूचना
तात्पुरते कार्यालये १० बाय १० पेक्षा जास्त जागेत असू नये. त्यात एक टेबल आणि दोन खुर्चा ठेवता येतील.
तात्पुरत्या कार्यालय खासगी मालमत्तेत अतिक्रमण करून उभारू नये, धार्मिक जागेत किंवा परिसरात, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आदी परिसरात उभारता येणार नाहीत
तात्पुरत्या कार्यालयात पक्ष ध्वज, पक्ष चिन्ह, छायाचित्र असेलेले एकच बॅनर आणि ध्वज लावता येईल.
या कार्यालयाचा वापर केवळ अशासकीय ओळखचिठ्ठ्या देण्यासाठी होईल, मात्र या चिठ्ठ्यांवर राजकीय पक्षाचे नाव, उमेदवाराचे पक्ष चिन्ह असू नये.
मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय प्रचार करता येणार नाही.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्राधिकृत निवडणूक कर्मचारी, पोलिस कर्मचारी वगळता मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन, वायरलेस संच, नेण्यासाठी प्रतिबंध राहील.