गडचिरोली: अतिसंवेदनशील ३७ मतदान केंद्रे सुरक्षित ठिकाणी होणार स्थानांतरीत pudhari photo
Published on
:
18 Nov 2024, 10:23 am
Updated on
:
18 Nov 2024, 10:23 am
गडचिरोली : येत्या २० नोव्हेंबरला होणारी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेली ३७ मतदान केंद्रे सुरक्षित ठिकाणी स्थानांतरीत करण्यात येणार आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत नक्षल्यांनी मतदान पथकांना लक्ष्य केलं होतं. परंतु, यंदा सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावले गेले. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशील आहे. दोन दिवसांपूर्वीच नक्षल्यांनी भामरागड तालुक्यात पुलाखाली लपवून ठेवलेली स्फोटके जप्त केली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी मागील सहा महिन्यांपासून आम्ही तयारी सुरु केली होती. पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय सुक्ष्म नियोजन केलं आहे. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील ३७ बूथ सुरक्षित ठिकाणी स्थानांतरीत करण्यात येत आहेत. केंद्रीय राखीव दल आणि राज्य शासनाचे पोलिस अशा एकूण १११ कंपन्यांचे १७ हजार पोलिस मतदानाच्या दिवशी तैनात असणार आहेत. मतदानाच्या दिवशी १३० ड्रोन आकाशातून जमिनीवरील हालचालींवर नजर ठेवणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेसाठी शासनाने वायुसेनेचे ५ हेलिकॉप्टर मदतीला दिले आहेत. दोनशेहून अधिक संवेदनशील मतदान पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या पोहविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरु झालेली ही प्रक्रिया १९ तारखेपर्यंत सुरु राहील, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
दोन दिवसांत अहेरी विधानसभा क्षेत्रातील ७६ आणि आज २५ अशा एकूण १०१ निवडणूक पथकांमधील ३५० हून अधिक मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्यासह भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे १४ बेसकॅम्पवर सुरक्षितरित्या पोहचविण्यात आले. आज गडचिरोली क्षेत्रातील १३ आणि आरमोरी क्षेत्रातील ३९ पथकातील कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे.