Published on
:
21 Nov 2024, 6:52 am
Updated on
:
21 Nov 2024, 6:52 am
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर व भोकरदन या पाचही विधानसभा मतदारसंघांतील एकूण १७५५ मतदान केंद्रावर स्काऊट गाईड व एनसीसी स्वयंसेवक नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एका मतदान केंद्रावर दोन या पद्धतीने जिल्ह्यातील सर्व १७५५ मतदान केंद्रावर जवळपास ४००० स्काऊट गाईड व एनसीसी स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये बहुसंख्य स्काऊट गाईडचे विद्यार्थी होते.
सर्व स्काऊट गाईड स्वयंसेवकांनी त्यांना नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर सकाळी सात पासून उपस्थित राहून ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना आपले मतदानाचे हक्क बजावण्यासाठी सेवा कार्य उत्साहात उत्कृष्टरीत्या केले. तसेच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लावणे, मतदारांना आवश्यक ती मदत व माहिती देणे, केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) यांना मदत करणे इत्यादी कार्य देखील केले.
यावेळी स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक तथा नोडल अधिकारी के. एल. पवार, प्रा. सुहास सदाव्रते, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी विनोद चौबे यांनी जालना शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन स्काऊट गाईड सेवा कार्याची पाहणी केली. तसेच ग्रामीण भागात जालना तालुक्यातील वाधरुळ या मतदान केंद्राला देखील भेट देऊन तेथील स्काऊट गाईड सेवेचे देखील पाहणी केली. त्याचप्रमाणे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक तथा नोडल अधिकारी शाम देशमुख, गटशिक्षणाधिकारी डॉ. भरत वानखेडे यांनी देखील जालना शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
चार हजार विद्यार्थी
या सेवा कार्यात जालना जिल्ह्यातील जवळपास एक हजार जिल्हा परिषद शाळा व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील जवळपास ४००० स्काऊट गाईड व एनसीसी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सेवेत असलेल्या सर्व स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या कार्याचे सर्व अधिकारी व सर्व मतदारांनी कौतुक केले.