Published on
:
21 Nov 2024, 8:20 am
Updated on
:
21 Nov 2024, 8:20 am
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा: वैजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रमेश बोरणारे आणि महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांच्यात हाय व्होल्टेज लढत झाली. एक-एक मतासाठी दोन्ही उमेदवारांत काट्याची लढत बघायला मिळाली. दर्गाबेस मतदान केंद्रावर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
मतदारसंघात दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. सोशल मीडियावरील फेक आयडीवरून उमेदवारांचे वादग्रस्त व्हिडिओ, उमेदवारांच्या चिथावणीखोर फेक पोस्ट, बोगस मतदानासह, मारहाणीचे प्रकार मतदारसंघात घडले आहेत.
दर्गाबेस परिसरात कार्यकर्त्यांत धक्काबुक्की
वैजापूर शहरातील दर्गाबिस बाजारतळ परिसरातील मतदान केंद्र क १७६, १७७ व १७८ जवळ दुपारी आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे व माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील शेख यांच्यात वाचावाची झाली. आमदार रमेश बोरणारे घटनास्थळी आल्यानंतर ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकत्यांसह पदाधिकारी समोरासमोर आल्यामुळे घोषणाबाजी, वाचाबाची झाली. त्यानंतर हा प्रकार धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. या घडामोडींमुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की, पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक शांमसुदर कौठाळे यांच्यासह पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना बाजूला नेल्याने या वादावर पडदा पडला. दरम्यान, या घटनेमुळे शहरामध्ये काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गंगथडी परिसरात तणाव
बोरणारे यांच्या एका समर्थकाचे महंत रामगिरी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराजांचे भक्त व नागरिक आक्रमक झाल्याने गंगथडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. वीरगावात दोन गटांत फिल्मी स्टाईल राडा झाला.
व्हायरल पोस्टप्रकरणी पोलिसांत गुन्हा
तालुक्यातील डोंगरथडी भागातील काही गावांत रात्रीच काही समाजकंटकानी फेक पोस्ट परदेशी यांच्या नावाने व्हायरल केली होती. परदेशी यांचे केवळ ओबीसी व मुस्लिम मतदारांना समर्थन असून मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे या व्हायरल पोस्टमध्ये म्हटले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. परदेशी यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात अनोळखी समाजकंटकावर गुन्हा दाखल करत फेक पोस्टविषयी समाजमाध्यामावर खुलासा केला.