Published on
:
17 Nov 2024, 4:24 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:24 am
मुंबई, नरेश कदम : Maharashtra Assembly Polls | लोकसभा, विधानसभेसह निवडणुकांमध्ये मुस्लिम समाज मतदान करण्यात आघाडीवर राहत असल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत हिंदू समाजामध्ये मात्र मतदानाविषयी उदासीनता असल्याचे चित्र आहे. परिणामी मुस्लिमांच्या ९९ टक्क्यांहून अधिक होणाऱ्या मतदानाचा लाभ काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना होताना दिसतो आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा अनुभव आल्याची आकडेवारी समोर आली आहे. हिंदूंची ही उदासीनता अंतिमतः लोकशाहीत स्लो पॉयझनिंग ठरण्याची भीती आहे
अलीकडील काही निवडणुकांत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मतदान करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुस्लिम मोहल्ल्यातील मतदान केंद्रांत मोठ्या रांगा लागल्याचे दिसते; तर हिंद वस्तीतील मतदान केंद्रांवर अपवादानेच गर्दी आढळते. निवडणुकीतील हा नवा ट्रेंड लोकशाही राजवटीत चिंताजनक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुस्लिम मोहल्ल्यात ९९ टक्के मतदान लोकसभा निवडणुकीत मुंबईसह राज्यातील मुस्लिमबहुल भागात ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाला ९९ टक्के मतदान झाले; तर भाजपच्या उमेदवाराला एका बूथवर १० पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, अशी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील अधिकृत आकडेवारी आहे. मात्र, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात तशीच पुनरावृत्ती झाली; तर ते महायुतीसाठी धोकादायक संकेत ठरू शकतात. जवळजवळ सर्वच मतदारसंघांत मुस्लिम मते एकगठ्ठा महाविकास आघाडीकडे वळल्याचे दिसून आले आहे, तर हिंदू समाजाचे मतदान मात्र तुलनेने खूप कमी झाले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील मोहम्मद येथील २० बूथमध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना ११,०५१ मते मिळाली होती; तर महायुतीच्या उमेदवारास अवघी १३० मते मिळाली होती. मुंबादेवी ३८ बूथमध्ये महायुतीला ४४ मते, तर ठाकरे गटाच्या उमेदवारास ५८६६ मते मिळाली. बूथ नंबर १९१ मध्ये महायुतीला एक मत, तर ठाकरे गटाला ३११ मते मिळाली. मीरारोड येथील नवानगरमध्ये २४ बूथमध्ये महायुतीला ३५४, तर आघाडीला १२,०५३ मते मिळाली होती.
मुस्लिम समाजाचे सर्वाधिक एकगठ्ठा ९९ टक्क्यांहून अधिक मतदान होत असल्याचे चित्र असल्याने मुस्लिम मतदान निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता बळावत चालल्याचे जाणकारांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने आपला मतदानाचा हक्क पूर्णपणे सर्वाधिक टक्क्याने बजावण्याची गरजही अधोरेखित होत आहे.
हिंदू मतदार अधिक, मात्रमतदान टक्का कमी
धुळे लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा क्षेत्रांत महायुतीच्या उमेदवारास ९१ हजार मताधिक्य होते. पण केवळ मालेगाव मध्य या मुस्लिमबहुल एका विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला १,९८,८७८ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवारास अवघी ४,५४२ मते मिळाली आणि भाजपचा केवळ ३,८३१ मतांनी पराभव झाला होता. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा हे पाच विधानसभा क्षेत्रात पुढे होते. मात्र, केवळ मानखुर्द या मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार संजय पाटील यांना १ लाख २६ हजार ७२ मते मिळाली आणि ते निवडून आले. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात वांद्रे पूर्व येथील मुस्लिमबहुल भारतनगर, टाटा कॉलनीतील आठ बूथवर काँग्रेसला ६००, तर भाजपला ६ मते अशाच सरासरीत मते मिळाली आहेत. नागपाडा येथील १२ बूथवर सरासरी ४५० मते काँग्रेसला तर ३ मतांच्या सरासरीत महायुतीला मते मिळाली आहेत. बेहरामपाडा, ग्लास बाजार, चुनाभट्टी, कुरेशीनगर येथील ३६,८१४ मतांपैकी काँग्रेसला ३६, २२३ तर भाजपला केवळ ५९१ मते मिळाली.
अमरावती लोकसभा क्षेत्रात जमील हायस्कूल या बूथवर काँग्रेसच्या उमेदवारास ७८३ मते मिळाली; तर भाजप उमेदवारास केवळ एक मत मिळाले. या भागातील ३६ बूथमध्ये काँग्रेसला २५,७४८ मते मिळाली, तर भाजपला १२६ मते मिळाली. (बातमीतील मतदानाचे आकडे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडील अधिकृत आकडेवारीनुसार आहेत)