Published on
:
08 Feb 2025, 6:27 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:27 am
मिरा-भाईंदर महापालिकेची पहिली सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) शाळा सुरु करण्यास होत असलेल्या विलंबाच्या अनुषंगाने हि शाळा केव्हा सुरु होणार? या मथळ्याखाली दैनिक पुढारीने 23 जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत परिवहन मंत्री तथा स्थानिक आ. प्रताप सरनाईक यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात हि शाळा सुरु करण्याचे निर्देश आयुक्त संजय काटकर यांना दिले. त्यानुसार यंदाच्या वर्षी हि शाळा सुरु करण्यात येणार असून त्यातील प्रवेशाची जाहिरात 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले. सुरुवातीला या शाळेत ज्युनिअर व सिनियर केजीचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेने भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक परिसरात बांधकाम टिडीआरच्या माध्यमातून चार मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत पालिकेची पहिली सीबीएसई शाळा सुरु करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेण्यात आला. त्यानुसार हि शाळा गेल्या शैक्षणिक वर्षांपासून कोणत्याही परिस्थितीत सुरु करून ती खाजगी संस्थेऐवजी पालिकेकडूनच चालविण्यात यावी, अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी घेतली होती. तर हि शाळा चालविणे अत्यंत खर्चिक बाब असल्याने ती पालिकेऐवजी खाजगी संस्थेमार्फतच चालविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते. शिक्षण विभागाने आयुक्त संजय काटकर यांच्या निर्देशानुसार डिसेंबर 2023 मध्ये एक्सप्रेशन ऑफ इन्टरेस्टचे (संबंधित कामात स्वारस्य असणे) प्रस्ताव खाजगी शैक्षणिक संस्थांकडून ऑनलाईन मागविले होते. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतर पालिकेने तब्बल तीन वेळा प्रस्ताव मागविले होते. पालिकेच्या इतर माध्यमांच्या शाळा ज्या पद्धतीने चालविल्या जातात त्याच पद्धतीने सीबीएसई शाळा चालविण्यात यावी, अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी त्यावेळी घेतली होती. तर प्रशासनाने शाळा सुरु करण्याची प्रक्रिया बासनात गुंडाळल्याने ती अद्याप सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
मिरा भाईंदर पालिका सीबीएसई शाळा यंदा सुरु होणार का? Pudhari News Network
परिणामी शाळेची इमारत धूळ खात उभी असून ती यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तरी हि सुरु होईल का, असे वृत्त दैनिक पुढारीने 23 जानेवारीला प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सरनाईक यांनी आयुक्तांना कोणत्याही परिस्थितीत हि शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरु करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयुक्तांनी हि शाळा यंदाच्या वर्षी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून सुरुवातीला ती पालिकेकडूनच चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळेतील शिक्षण पालिका शाळेतील शिक्षकांकडूनच दिले जाणार असून सुरुवातीला या शाळेत ज्युनिअर व सिनिअर केजीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे. त्यातील प्रवेशासाठी 1 एप्रिल रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याचप्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या इतर शाळांप्रमाणेच मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
या शाळेत मिळणार शिक्षण मोफत-प्रताप सरनाईक
मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या सीबीएसई शाळांनंतर मिरा-भाईंदर महापालिका सीबीएसई शाळा सुरु करणारी दुसरी महापालिका ठरणार आहे. सुरुवातीला हि शाळा पालिकेकडून चालविण्यात येणार असली तरी भविष्यात एखाद्या संस्थेने हि शाळा चालविण्यात स्वारस्य दाखविल्यास पालिकेने निश्चित केलेल्या धोरणानुसार त्या संस्थेला शाळा चालविण्यासाठी दिली जाणार आहे. या शाळेतील शिक्षण मोफत असल्याने त्याचा लाभ शहरातील गरीब व सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.