नाशिक : परीक्षा देवून बाहेर पडणारे उमेदवार. (छाया : रूद्र फोटो)
Published on
:
03 Feb 2025, 3:46 am
Updated on
:
03 Feb 2025, 3:46 am
नाशिक : पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी घेण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांनी दिली. प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवून 40 लाखांची विद्यार्थ्यांकडे मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, प्रश्नपत्रिका फुटीची शंका विद्यार्थ्यांच्या मनात होती. मात्र, चोख बंदोबस्तात कुठेही अनुचित प्रकार समोर न येता, परीक्षा पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि. 2) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. एका सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी 20 हजार 73 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 15 हजार 385 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. तर चार हजार 688 विद्यार्थी अनुपस्थित होते. शहरातील एकुण 52 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून 40 लाखात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे विद्यार्थ्यांना आमिष दाखविणारे फोन आल्याने, या परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचे सावट होते.
पुणे आणि नाशिकमधील काही विद्यार्थ्यांना याबाबतचे आमिष दाखविणारे फोन आले होते. काही उमेदवारांकडे कागदपत्रे मागूण पैसे हप्त्याहप्त्याने देण्याबाबतचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केला होता. विद्यार्थ्यांनी आमिषाला बळी न पडता, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी आव्हान केले होते.
जिल्हा प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार समोर येवू नये म्हणून चोख पद्धतीने परीक्षा हाताळली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर तसेच केंद्राबाहेरील परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. वेळेवर आलेल्या उमेदवारांनाच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला. तसेच आयोगाने दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन केले की नाही, याचीही खातरजमा करण्यात आली. परीक्षेत कोणताही गैरप्रकार समोर आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
पुणे आणि नाशिकमधील काही विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवून तब्बल ४० लाखांची मागणी करणाऱ्या दोघा भामट्यांना नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फोन कॉलची आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याबाबतचा तपास केला असता, भंडारा येथून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.