नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिकPudhari News Network
Published on
:
07 Feb 2025, 4:39 am
Updated on
:
07 Feb 2025, 4:39 am
सिडको : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (दि. ५) दुपारी पवननगर पोलिस चौकी येथे ‘पोलिस आयुक्त आपल्यादारी’ उपक्रम राबविला. मात्र, त्याच दिवशी रात्री सुमारे दहा वाजता सावतानगर परिसरात हद्दपार गुंडासह तीन ते चार अज्ञातांनी दोन दुचाकीवरून फिरत, हातात कोयते घेऊन तिघांवर हल्ला केला. (Police at Your Doorstep initiative )
‘जो आमच्या आड येईल, त्याचा खून करू’ अशी धमकी देत हद्दपार गुंडानी उघडपणे कायदा-सुव्यवस्थेला आव्हान दिले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक व्यापाऱ्यांनी घाबरून दुकाने बंद केली. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, आता पोलिसांची पुढील कारवाई काय असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलिस आयुक्त आपल्यादारी या नाशिक शहर पोलीस यांच्या उपक्रमातून वरिष्ठ अधिकारी सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत असले तरी, दुसरीकडे गुन्हेगार आपली दहशत कायम ठेवण्यासाठी उघडपणे शस्त्र नाचवत असल्याचे वास्तव आहे. बुधवारी (दि.5) घडलेल्या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पंकज देसले (रा. सावतानगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ते वडिल प्रल्हाद आणि शेजारी प्रशांत शिंपी, हर्षल पाटील, सुबोध शेवाळे, अमोल शिंदे असे उभे होते. तेव्हा परिसरातील संशयित हद्दपार गुन्हेगार पवन वायाळ हा दोन ते तीन साथीदारांसमवेत दोन दुचाकींवरुन आला. त्यांनी धारदार कोयत्यासारख्या हत्यारांचा धाक दाखवून नागरिकांना शिवीगाळ सुरू केली. काही कारण नसताना प्रशांत शिंपी (४२, रा. नेहरूचौक) यांच्या पोटावर वायाळने वार केला.
तुझा गेमच करून टाकतो, असे म्हणत अमोल शिंदे (३४, रा. मटाले मंगळ कार्यालय) यांच्यावर कोयता उगारला तो त्यांच्या खांद्यावर लागला. त्यानंतर हल्लेखोरांनी जोरजोरात आरडाओरड करत, देसले यांच्यावर वार केलेत. 'जो आम्हाला आडवेल त्याचा मर्डर करू' अशी धमकी देऊन त्यांनी वाहनांना लाथा मारल्या. या अनपेक्षित घटनेने एकच गोंधळ उडून नागरिकांनी घरे, दुकाने बंद करुन घेतले. रस्त्यावरील नागरिक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळाले. काही वेळात अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले, परंतू तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित पवन वायालसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार, पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोरांचा माग काढला जात आहे. (The phone number for the Police at your Doorstep initiative in Maharashtra is 112. You can also use the Maharashtra Dial 112 app or the Citizen Portal for emergencies)