सामंत म्हणतात, ऑपरेशन टायगरची गरज नाही, योग्य वेळी सर्व कळेल!File Photo
Published on
:
07 Feb 2025, 6:30 am
Updated on
:
07 Feb 2025, 6:30 am
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
आम्हाला ऑपरेशन टायगर राबविण्याची गरज नाही. गेल्या वेळी प्रमाणे गुवाहाटीला देखील जाण्याची गरज नाही. उबाठाचे अनेक जण आमच्याच संपर्कात आहेत. मात्र आजच सर्व काही सांगणे योग्य नाही. योग्य वेळी योग्य निर्णय होतील आणि त्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना देतील असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
नागपुरातील खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन निमित्ताने आले असता ते माध्यमांशी विमानतळावर बोलत होते. दरम्यान, महायुतीत कुठलेही मोठे प्रवेश होणार असतील तर ते तिन्ही पक्षांच्या समन्वयाने होतील असे अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले. त्याकडे लक्ष वेधले असता प्रत्येक जण आपला पक्ष वाढविण्यासाठी स्वतंत्र आहे. आम्ही आमचा शिवसेना पक्ष वाढवित असून भाजप आपला तर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
समन्वय ठेवूनच महायुती पुढे जात आहे असे सांगत सामंत यांनी भविष्यातील रणनीती आजच स्पष्ट करता येणार नाही असे संकेत दिले. आपणही चौथ्यांदा मंत्री झाल्याने कितीही उलट सुलट प्रश्न विचारले तरी तुम्हाला आजच अपेक्षित उत्तर मिळणार नाही असा टोला लगावला. दरम्यान, उद्धव गटाचे अस्तित्व काय आहे हे आम्ही विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील ते दिसणार आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व काय, हे त्यांनाच विचारा असे सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याची, राज्याचा विकास करण्याची क्षमता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात दाखवली असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक खासदार आमदार आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट केले.