बडगुजरांच्या प्रतिनिधींनी निवडणूक शाखेचे म्हणणे अमान्य केल्यामुळे फेरमतमोजणीचा अर्ज निकालात निघण्याची शक्यता आहे.FILE
Published on
:
28 Nov 2024, 4:02 am
Updated on
:
28 Nov 2024, 4:02 am
नाशिक : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निकालावर आक्षेप घेत, १२९ मतदान केंद्रांतील ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार पाच टक्के केंद्रांच्या यंत्रांच्या तपासणीची मागणी करता येते. तसेच या यंत्रावर यापूर्वी झालेल्या मतांची नव्हे, तर नव्याने केवळ मतदानाचे प्रात्यक्षिक घेत पडलेली मते व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पडताळणी करू शकणार आहे. त्यामुळे बडगुजरांच्या प्रतिनिधींनी निवडणूक शाखेचे म्हणणे अमान्य केल्यामुळे फेरमतमोजणीचा अर्ज निकालात निघण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर शंका घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिक पश्चिमचे बडगुजर यांनी सात केंद्रांत मतदान यंत्रे अथवा व्हीव्हीपॅट परस्पर बदलल्याचा आरोप केला होता. परंतु निवडणूक शाखेने ते फेटाळले. त्यानंतर बडगुजर यांनी १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटची सखोल पडताळणीची मागणी केली. त्या केंद्रांची यादीही त्यांनी निवडणूक शाखेकडे सादर केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यास लेखी उत्तर दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरात, पाच टक्के केंद्रांच्या निकषानुषार प्रतिमतदान यंत्र व व्हीव्हीपॅटसाठी ४० हजार रुपये आणि १८ टक्के जीएसटीसह शुल्क विहित मुदतीत भरावे लागेल. शुल्क भरल्याची पावती सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीईएल कंपनीचे अभियंता यांच्याकडून उमेदवारासमोर मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटची तपासणी केली जाईल, असे शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच तपासणी म्हणजे फेरमतमोजणी किंवा फेरपडताळणी नाही. उमेदवार ज्या पाच टक्के केंद्रांवरील यंत्र सांगतील, त्यावर मतदानाचे प्रात्यक्षिक होईल. म्हणजे या यंत्रांवर नव्याने ५०० किंवा हजार मतदान केले जाईल. हे मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्रावरील चिठ्ठ्यांची पडताळणी करून ती यंत्रे योग्य प्रकारे कार्यरत असल्याची उमेदवाराला खात्री करून दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
निकालानंतर फेरमतमोजणी नाही
उमेदवारांच्या मागणीनुसार प्रात्यक्षिक करण्याआधी नियमानुसार त्या यंत्रावरील सर्व माहिती पुसावी लागणार आहे. म्हणजेच यंत्रावरील प्रत्यक्ष निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती नष्ट होईल. आयोगाच्या निकषानुसार मतमोजणी सुरू असताना फेरमतमोजणी करता येते. एकदा निकाल जाहीर झाल्यावर फेरमतमोजणी किंवा फेरपडताळणीची मागणी ग्राह्य धरली जात नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.