नाशिक : त्रिपक्षीय शैक्षणिक सामंजस्य कराराप्रसंगी शंतनू ठाकूर, उन्मेष वाघ, दिलीप भरड, डॉ. जयदीप निकम.Pudhari News Network
Published on
:
02 Feb 2025, 4:24 am
Updated on
:
02 Feb 2025, 4:24 am
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) व वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लि., मुंबई (व्हीपीपीएल) यांच्यासोबत महत्त्वाकांक्षी त्रिपक्षीय शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच मुंबई येथे या करारावर तिन्ही पक्षांच्या वतीने स्वाक्षरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम, जेएनपीए व वाढवन पोर्ट व्हीपीपीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
करारानुसार वाढवण बंदरनिर्मितीच्या पार्श्वभूमीवर व तेथील गरज आणि मागणीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास एक लाख युवक-युवतींना मुक्त विद्यापीठातर्फे व्यवसाय व रोजगाराभिमुख कौशल्य आधारित शिक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
'जेएनपीए'व 'व्हीपीपीएल'ने कराराच्या अनुषंगाने १९ विविध कौशल्य आधारित शिक्षणक्रमांची यादी मुक्त विद्यापीठाकडे सादर केली. त्यानुसार विद्यापीठाकडून त्या त्या क्षेत्रातील व विषयातील तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रमाणपत्र, पदविका व पदवी स्तरावरील संबंधित शिक्षणक्रम तयार केले जाणार आहेत. संबंधित इच्छुक विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी तशा प्रकारची विविध अभ्यासकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
वाढवण बंदरनिर्मितीत मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. ऑटोमोबाइल, पॅकेजिंग, लॉजिस्टिक सपोर्ट, मालवाहतूक व इतर उद्योग आदी विविध प्रकारचे कौशल्य आधारित शिक्षणक्रम विद्यापीठातर्फे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे वाढवण बंदरनिर्मितीसाठी व तद्नंतर परिचलनासाठी मनुष्यबळ निर्मितीसाठी करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ, नाशिक.